Join us  

खराब फॉर्ममध्ये असलेल्या KL Rahul च्या निवडीवरुन वाद; नेटकऱ्यांसह माजी क्रिकेटर भिडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 4:20 PM

Open in App
1 / 8

KL Rahul : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटची ही लढत सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. पण या मालिकेत सर्वाधिक चर्चा भारतीय सलामीवीर केएल राहुलची होत आहे. केएल राहुल टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये असावा की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

2 / 8

केएल राहुल स्वतः चांगली कामगिरी करत नाही आणि त्याच्यामुळे इतर खेळाडूंनाही संघात जागा मिळत नाही, असा आरोप केला जात आहे. केएल राहुलच्या बाबतीत टीम इंडिया पक्षपातीपणा दाखवत आहे का? असा प्रश्नही अनेकजण विचारत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून याचीच चर्चा होत आहे.

3 / 8

केएल राहुलचा सध्या पूर्णपणे फॉर्मबाह्य आहे. कसोटी क्रिकेटमध्ये संघाला चांगली सुरुवात करून देणे ही सलामीवीराची जबाबदारी असते, पण केएल राहुल पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्याच्या फॉर्मबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे आता क्रिकेटविश्वात नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

4 / 8

केएल राहुलच्या निवडीवरून वाद- केएल राहुल त्याच्या खराब फॉर्ममुळे टीकेचा धनी ठरत आहे, पण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केएल राहुलचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, असा टप्पा प्रत्येक खेळाडूच्या करिअरमध्ये येतो, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की केएल राहुल टीम इंडियासाठी सर्वोत्तम फलंदाज आहे, विदेशी खेळपट्ट्यांवर त्याचा रेकॉर्ड चांगला आहे.

5 / 8

कर्णधार रोहित शर्माने देखील केएल राहुलचे समर्थन केले. तो म्हणाला की, जर एखाद्या खेळाडूकडे गुणवत्ता असेल आणि तो संघासाठी खूप महत्वाचा असेल तर आपण त्याला वेळ दिला पाहिजे. रोहित शर्माने केएल राहुलचे आधीच उघडपणे समर्थन केले आहे आणि म्हटले की केएल राहुलचे योगदान कधीकधी योग्यरित्या पाहिले जात नाही.

6 / 8

माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद सतत केएल राहुलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने ट्विटरवर आपले मत व्यक्त करत आहे. यादरम्यान आकाश चोप्रासोबत त्यांची वादावादीही झाली होती. व्यंकटेश प्रसाद यांनी केएल राहुलला कौंटी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. व्यंकटेश प्रसाद यांनी मयंक अग्रवाल, शुभमन गिल या खेळाडूंना संधी देण्याचे मत व्यक्त केले.

7 / 8

माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक आकाश चोप्राने केएल राहुलचे समर्थन केले आहे. आकाश चोप्रा म्हणतो की, सध्याच्या युगात विदेशी खेळपट्ट्यांवर टीम इंडियाकडे केएल राहुलपेक्षा चांगला सलामीवीर नाही. त्याला अनुभवही आहे. सर्वांना माहित आहे की केएल राहुल खूप प्रतिभावान आहे, म्हणूनच संघ व्यवस्थापन सर्व अडचणी असूनही त्याला सतत पाठिंबा देत आहे.

8 / 8

राहुलची कसोटीतील शेवटच्या 10 सामन्यांतील कामगिरी: 1, 17, 20, 2, 10, 23, 22, 10, 12, 12. ODI मधील शेवटच्या 10 सामन्यांतील कामगिरी: 7, 64*, 39, 8, 14, 73, 30, 1, DNB, 49. T20 मधील शेवटच्या 10 सामन्यातील कामगिरी: 5, 51, 50, 9, 9, 4, 57, 51*, 1, 10. केएल राहुलचा कसोटी विक्रम- 47 सामने, 2642 धावा, 33.44 सरासरी, 7 शतके, 13 अर्धशतके. घरच्या मैदानावर: 16 सामने, 923 धावा, 40.13 सरासरी. परदेशात: 31 सामने, 30.69 च्या सरासरीने 1719 धावा.

टॅग्स :लोकेश राहुलरोहित शर्माराहुल द्रविड
Open in App