KL Rahul And Team India: केएल राहुलला श्रीलंका मालिकेत मिळाली जागा; न्यूझीलंडविरुद्ध स्वत:च माघार घेण्याची शक्यता

kl rahul marriage: श्रीलंकेविरूद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.

भारतीय संघ नववर्षात आपल्या अभियानाची सुरूवात मायदेशात श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून करणार आहे. या मालिकेसाठी मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघ जाहीर केला आहे. ट्वेंटी-20 आणि वन डे दोन्ही मालिकांसाठी यजमान संघ 2 वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात असणार आहे.

खरं तर भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुलला श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. मात्र वन डे संघात त्याला स्थान मिळाले आहे. मात्र, 18 जानेवारीपासून न्यूझीलंडविरूद्ध सुरू होणाऱ्या मालिकेतून राहुल बाहेर होण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा होण्याआधी राहुलने बीसीसीआयकडे सुट्टी मागितली असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्याला आगामी वन डे मालिकेत स्थान मिळाले आहे. त्यामुळे स्पष्ट झाले आहे की जानेवारीच्या सुरूवातीला लोकेश राहुल आणि आथिया शेट्टी विवाहबंधनात अडकणार नाहीत.

पिंकविलाच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टनुसार, लोकेश राहुल आणि अथिया शेट्टीचे लग्न 21 ते 23 जानेवारी दरम्यान होणार आहे. मात्र, दोन्ही कुटुंबीयांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. पण ही तारीख निश्चित ठरली तर राहुल न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेतून माघार घेऊ शकतो.

भारतीय संघ श्रीलंकेविरूद्धची मालिका संपल्यानंतर 18 जानेवारीपासून न्यूझीलंडविरूद्ध मालिका खेळणार आहे. भारताला 18 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत 3 सामन्यांची वन डे आणि 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका खेळायची आहे.

अशा परिस्थितीत 21 ते 23 जानेवारी दरम्यान राहुल आणि अथियाचे लग्न झाले तर भारतीय क्रिकेटपटूला न्यूझीलंड दौरा सोडावा लागणार हे निश्चित आहे.

माहितीनुसार, लोकेश राहुल आणि आथिया शेट्टीचे लग्न दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार होणार आहे. कपड्यांबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही, पण आथियाचा आवडता डिझायनर मनीष मल्होत्रा ​​आहे. अशा स्थितीत आथियाच्या लग्नाचा पोशाख त्यानेच डिझाईन केला असेल अशी अपेक्षा आहे.

ट्वेंटी-20 संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.