भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय परिस्थिती अतिशय बिकट आहे हे सर्वश्रुत आहे. तशातच पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक संबंध अधिकच बिघडले आहेत.
सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत अशा IPL टी२० स्पर्धेमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना सहभागी करून घ्यायचे नाही, असा नियम BCCI ने मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर केला होता.
हा नियम सर्व फ्रँचायजीकडून काटेकोरपणे पाळण्यात येतो. तसेच लिलावातही पाकिस्तानी खेळाडूंना समाविष्ट केले जात नाही. पण आता 'सनरायजर्स'च्या ताफ्यातून एक वेगळीच बातमी आली आहे.
सनरायझर्स हैदराबादची (SRH) मालकीण काव्या मारन हिने क्रिकेट जगतातील एक अलिखित संकेत मोडीत काढला आहे. तिने 'सनरायजर्स'च्या ताफ्यात पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतले आहे.
इंग्लंडमध्ये होणाऱ्या 'द हंड्रेड' या विशेष प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेसाठी 'सनरायझर्स लीड्स' या संघाने पाकिस्तानच्या एका स्टार खेळाडूला करारबद्ध केले असल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.
इंग्लंडमधील 'द हंड्रेड' स्पर्धेच्या २०२६च्या लिलावात (Draft) सनरायझर्स लीड्सने अबरार अहमद याला १.९० लाख पाउंड म्हणजेच सुमारे २.३४ कोटी रुपये मोजून आपल्या संघात सामील केले आहे.
IPL फ्रँचायझीच्या मालकीचे संघ सहसा पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध करणे टाळतात. मात्र, काव्या मारनने ही प्रथा मोडीत काढत अबरार अहमदला आपल्या संघात संधी दिली आहे.
भारतीय मालकीच्या संघात पाकिस्तानी खेळाडू सामील झाल्याने सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याकडे व्यावसायिक निर्णय म्हणून पाहिले, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.