BCCI Elections : तिजोरीच्या चाव्या आशिष शेलार यांच्या हाती; Sourav Ganguly अध्यक्षपदावरून हटणार, Jay Shah सचिवपदी कायम 

BCCI Elections : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) अध्यक्षपदावर सौरव गांगुली ( Sourav Ganguly) हे नाव आता नसेल, हे जवळपास निश्चित झाले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) अध्यक्षपदावर सौरव गांगुली ( Sourav Ganguly) हे नाव आता नसेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी ( Roger Binny) यांचे अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर आहे.

आज बीसीसीआयची मुंबईत एक बैठक पार पडली आणि त्यात नव्या अध्यक्षासाठी बिन्नी यांच्या नावावर अनेकांनी सहमती दर्शवली. आता सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला आयसीसीवर पाठवण्याच्या निर्णयाचा फैसला येत्या १-२ दिवसात घेतला जाणार आहे. १८ ऑक्टोबरला बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडेल आणि त्यात गांगुलीसह जय साह व अन्य दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

रॉजर बिन्नी हे BCCI चे नवीन अध्यक्ष असतील, तर राजीव शुक्ला यांच्याकडे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी असेल. जय शाह हे सचिवपदावर कायम राहणार आहेत.

सौरव गांगुली आता BCCI च्या अध्यक्षपदावर कायम राहणार नाही, ICCमध्ये बीसीसीआयचा प्रतिनिधी म्हणून त्याचे नाव आघाडीवर आहे

आयपीएलच्या चेअरमनपदी सध्याचे BCCI खजिनदार अरुण धुमाळ यांचे नाव आघाडीवर असून भाजपा नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांच्याकडे BCCIचे खजिनदारपद जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

आशिष शेलार यांनी सोमवारीच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल केला आणि शरद पवार यांच्या पॅनलने शेलार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आगामी निवडणुकीला सोमवारी मोठी कलाटणी मिळाली. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना, या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता असलेले शरद पवार आणि आशिष शेलार गटांनी युती करत सर्वांनाच चक्रावून सोडले. पवार आणि शेलार यांनी चर्चा करून एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. यानंतर, संदीप पाटील गटाने आपल्या गटाचे नाव बदलून ‘मुंबई क्रिकेट ग्रुप’ असे ठेवले.

पवार-शेलार गटामध्ये मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश असून, या दोन्ही उमेदवारांनी अपेक्स कौन्सिलपदासाठी अर्ज भरला आहे, तसेच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले अमोल काळे यांनी पवार-शेलार गटातून उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. या आधी एमसीए निवडणुकीसाठी पवार यांनी आपला वेगळा गट जाहीर केला होता, तसेच उमेदवारांनी उमेदवारी अर्जही भरले होते.