Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

जसप्रीत बुमराहनं साधला मोठा डाव; इथं पाहा खास रेकॉर्ड

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील गोल्ड कोस्टच्या मैदानात रंगलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहनं ४ षटकांच्या कोट्यात २७ धावा खर्च करत एक विकेट घेतली. आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विकेट्सचा 'शतकी' डाव साधण्यापासून बुमराह आता फक्त एक पाऊल दूर आहे. या मोठ्या विक्रमाआधी त्याने पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत खास विक्रमाला गवसणी घातली.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात एक विकेट आपल्या खात्यात जमा करताच बुमराहनं आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थान पटकावले. पाकिस्तानच्या सईद अजमल याला मागे टाकत बुमराह नंबर वन गोलंदाज ठरला आहे.

जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत १६ टी-२० सामने खेळले असून यात त्याने २० विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीसह त्याने छोट्या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा सईद अजमल ११ डावातील १९ विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० सामन्यात १० डावात १७ विकेट्स घेतल्या आहेत.

न्यूझीलंडचा मिचेल सँटनर याने देखील ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपल्या गोलंदाजीत कमाल दाखवली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० सामन्यात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात १२ डावात १७ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतील आघाडीच्या चौघांपैकी जसप्रीत बुमराह आणि मिचेल सँटनर हे दोघेच सध्याच्या घडीला सक्रीय आहेत. येत्या काळात या दोघांमध्येच स्पर्धा पाहायला मिळेल.