Kapil Dev: "...तर कर्णधार म्हणून सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे", कपिल देव यांनी रोहितला दिला मोलाचा सल्ला

kapil dev on rohit sharma: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली.

अशातच भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी कर्णधार रोहित शर्माला एक मोलाचा सल्ला दिला आहे. कर्णधार म्हणून तंदुरूस्त असणे खूप महत्त्वाचे असल्याचे कपिव देव यांनी म्हटले आहे.

"तंदुरूस्त असणे खूप महत्त्वाचे आहे. कर्णधार म्हणून जर तुम्ही तंदुरूस्त नसाल तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे. रोहित शर्माने कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे", असे कपिल देव यांनी हिटमॅनच्या फिटनेसवर म्हटले.

"तो एक महान फलंदाज आहे पण जेव्हा तुम्ही त्याच्या फिटनेसबद्दल बोलता तेव्हा तो थोडा जास्त वजनाचा दिसतो, किमान टीव्हीवर. होय, जेव्हा तुम्ही एखाद्याला टीव्हीवर आणि नंतर वास्तविक जीवनात पाहता तेव्हा ते वेगळे असते. पण मी जे काही पाहतो त्यावरून रोहित हा एक उत्तम खेळाडू आणि उत्तम कर्णधार आहे", असे कपिल देव यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले.

तसेच रोहित शर्माला तंदुरुस्त होण्याची गरज आहे. विराटकडे बघा, जेव्हाही तुम्ही त्याला पाहता तेव्हा तुम्ही म्हणाल, 'याचा काय फिटनेस आहे' असे कपिल यांनी आणखी सांगितले.

आधीच्या एका मुलाखतीत 1983 च्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराने सांगितले की, रोहित त्याच्या क्रिकेट कौशल्याचा विचार करता सर्वोत्कृष्ट आहे, परंतु त्याच्या फिटनेसबद्दल असेच म्हणता येणार नाही.

"रोहित शर्मामध्ये कोणतीही कमतरता नाही. त्याच्याकडे सर्व काही आहे पण मला वाटते की, त्याच्या फिटनेसबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. तो पुरेसा फिट आहे का? कारण कर्णधार असा असला पाहिजे जो इतर खेळाडूंना फिट होण्यासाठी प्रेरित करेल, संघसहकाऱ्यांना त्यांच्या कर्णधाराचा अभिमान वाटला पाहिजे", असे कपिल देव यांनी म्हटले होते.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत 2023च्या वन डे विश्वचषकाच्या यजमानपदासाठी सज्ज आहे. ऑक्‍टोबर ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नियोजित झालेल्या पुरुषांच्या 50 षटकांच्या विश्‍वचषक स्पर्धेची ही 13वी आवृत्ती असेल.

सध्या भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वात मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. 1 ते 5 मार्च दरम्यान या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.