Rohit Sharma, IND vs AUS: "हा निव्वळ मूर्खपणा ठरेल, रोहितला उगाच 'बळीचा बकरा' बनवू नका"; माजी क्रिकेटर संतापला

Rohit Sharma Team India, IND vs AUS Test: रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३ धावांवर तर दुसऱ्या डावात ६ धावांवर बाद झाला

टीम इंडियाने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिली कसोटी जिंकली. त्यानंतर रोहित शर्माने दुसऱ्या कसोटीत भारताचे नेतृत्व केले. पण भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव १८० धावांत आटोपला. नंतर ऑस्ट्रेलियन धडाकेबाज खेळाडू ट्रेव्हिस हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दणकेबाज ३३७ धावा केल्या.

भारताला दुसऱ्या डावातही कमाल करता आली नाही. अवघ्या १७५ धावांवर भारताचा डाव संपला. अवघ्या १९ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून पूर्ण केले आणि मालिकेत १-१ बरोबरी साधली.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात मधल्या फळीत खेळायला आला. पहिल्या सामन्यात राहुल-जैस्वाल जोडी यशस्वी ठरल्याने रोहितने असा निर्णय घेतला होता, पण त्याचा निर्णय फसला.

रोहित शर्माने पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर खेळताना केवळ ३ (२३ चेंडू) धावा केल्या. तर दुसऱ्या डावातही १ चौकार मारून अवघ्या ६ धावांवर (१५ चेंडू) रोहित शर्मा माघारी परतला.

रोहित शर्माची मधल्या फळीत खेळण्याची सवय सुटली असून त्याने सलामीलाच फलंदाजी करावी, असे मत दुसऱ्या कसोटीनंतर सुनील गावसकरांसह अनेक क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केले.

रोहितने ओपनिंगला यावे का? यावर एका माजी क्रिकेटपटू मात्र वेगळे आणि अत्यंत सडेतोड मत मांडले. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर रोहितने सलामी येणे म्हणजे त्याला बळीचा बकरा बनवण्यासारखे आहे.

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यांनी ट्विट करत लिहिले, "रोहित शर्मामध्ये सध्या आत्मविश्वासाची कमतरता दिसते आहे. त्याच्या बॅटमधून धावाही निघत नाहीयेत ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी."

"सध्याच्या स्थितीत पुढच्या कसोटीमध्ये रोहित शर्माला ओपनिंग उतरायला सांगणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा ठरेल. कारण ही कसोटी मालिका भारतीय उपखंडात नव्हे तर ऑस्ट्रेलियात सुरू आहे."

"आशिया खंडातील खेळपट्ट्यांची रोहितला सवय आहे. त्यामुळे तो फटके मारून धावा करू शकतो. पण ऑस्ट्रेलियात चेंडू स्विंग होतो. अशा वेळी रोहितला अचानक ओपनिंगला पाठवणे म्हणजे त्याला बळीचा बकरा बनवल्यासारखे होईल."

भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसरी कसोटी १४ ते १९ डिसेंबर दरम्यान गाब्बाच्या मैदानावर होणार आहे. हा सामना WTC FINAL 2025 साठी दोन्ही संघांना महत्त्वाचा आहे.