राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर कायम राहण्यास अनुत्सुक? या व्यक्तिचं नाव चर्चेत

Team India set to get new coach - रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्याकडे सोपवली गेली.

BCCI चा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याने दी वॉल द्रविडला ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार केले. पण, राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी स्पर्धांमध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही.

आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदावर कायम राहण्यास उत्सुक नाही. त्यामुळे भारताने वर्ल्ड कप जिंकला किंवा नाही जिंकला, द्रविड या स्पर्धेनंतर जबाबदारीतून मुक्त होणार हे नक्की आहे.

भारतीय संघासोबत सतत प्रवास करावा लागत असल्याने आणि त्यामुळे कुटुंबियांना वेळ द्यायला मिळत नसल्याने, द्रविड अस्वस्थ असल्याचे त्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले. ''हा त्याच्यासाठी खडतर प्रवास ठरला आहे. राहुलला स्थिर जीवन आवडते आणि म्हणूनच त्याला सुरुवातीला ही जबाबदारी स्वीकारायची नव्हती. त्याला संघासोबत दीर्घ दौऱ्यांवर प्रवास करावा लागला आहे आणि त्यामुळे कुटूंबाला वेळ द्यायला मिळत नाही. भारताने वर्ल्ड कप जिंकला तरी तो त्याच्या भविष्यावर निर्णय घेईल,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी इनसाईडस्पोर्ट्सला सांगितले.

मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या वृत्ताचा इन्कार केला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, बीसीसीआय राहुल द्रविडच्या कराराच्या नूतनीकरणाबाबत वर्ल्ड कपपूर्वी किंवा नंतर चर्चा करेल. मात्र, सध्या २०२३ चा वर्ल्ड कप जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. “राहुल सोबत मुदतवाढ किंवा नूतनीकरणावर कोणतीही चर्चा झालेली नाही. सध्या आमचे सर्व लक्ष वर्ल्ड कपवर आहे. पण हो, आम्ही वर्ल्ड कप स्पर्धेसमोर राहुलशी चर्चा करू. आतापर्यंत, आम्हाला असे कोणतेही संकेत मिळाले नाहीत,” बीसीसीआयच्या दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ नंतर रवी शास्त्री यांच्याकडून पदभार स्वीकारल्यापासून, राहुल द्रविडचा संमिश्र रेकॉर्ड आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली, भारताने घरच्या मैदानावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक मालिका गमावली आहे. भारताला कसोटी आणि वन डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून, वनडे मालिकेत बांगलादेशकडून तसेच आशिया चषक, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

राहुल द्रविड आणि बीसीसीआयने मार्ग न काढल्यास व्हीव्हीएस लक्ष्मण हा एक चांगला पर्याय असू शकतो. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक आहे.