वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) नवीन दरांचा परिणाम आता क्रिकेटवरही होणार आहे. जगातील सर्वात मोठी लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL)चे तिकिटेही आता महाग होणार आहेत. त्यामुळे स्टेडियममध्ये सामना पाहायला जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आयपीएल तिकिटांवर जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये वाढ झाल्याने IPL 2026 च्या हंगामापासून हा बदल दिसून येणार आहे.
सुरूवातीपासून आयपीएल तिकिटांवर २८% जीएसटी आकारला जात होता. त्यामुळे १००० रूपयांच्या तिकिटाची एकूण किंमत १२८० रुपये इतकी होत होती. पण आता नवीन दरानुसार या तिकिटाची किंमत बरीच वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आयपीएल तिकिटांवर ४० टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी तो २८ टक्के होता. त्यामुळे आयपीएल तिकिटे महाग होऊ शकतात. याचा थेट परिणाम तिकीट घेणाऱ्या चाहत्यांच्या खिशावरही होईल.
सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाणाऱ्या चाहत्यांना आता १००० रूपयांच्या तिकीटासाठी १२८० ऐवजी १४०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. याचाच अर्थ चाहत्यांना आता हजाराच्या तिकीटावर १२० रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत.
त्याचप्रमाणे ५०० रुपयांच्या तिकिटावर आता ६४० रुपयांऐवजी ७०० रुपये द्यावे लागतील. तर दुसरीकडे, २००० रुपयांच्या तिकिटावर चाहत्यांना २५६० रुपयांऐवजी २८०० रुपये द्यावे लागतील. त्याचा परिणाम आयपीएल २०२६ दरम्यान स्टेडियममध्ये दिसून येईल.