वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोव्हमन पॉवेल सध्या आयपीएलमध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. पॉवेलनं गुरुवारी दिल्ली कपिटल्स संघाला सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात २१ धावांनी विजय प्राप्त करुन दिला.
दिल्लीच्या या धाकड फलंदाजानं सामन्यात आपली ताकद दाखवून दिली. पॉवेल यानं ३५ चेंडूत ६७ धावांची खेळी साकारली. यात त्यानं ६ खणखणीत षटकार खेचले. उमरान मलिक आणि सीन अॅबॉटसारख्या वेगवान गोलंदाजांची त्यानं धुलाई केली. पॉव्हेलचा स्ट्राइक रेट १९१.४३ इतका होता.
२८ वर्षीय पॉवेल यानं दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये २.८० कोटींची बोली लावत संघात दाखल करुन घेतलं. वेस्ट इंडिजच्या जमैका येथे जन्म झालेला हा स्टार खेळाडू सध्या आलिशान आयुष्य जगत असला तरी त्याच्या आजवरच्या खडतर आयुष्याची कहाणी खूप प्रेरणादायी आहे.
रोव्हमन पॉवेल आणि त्याच्या बहिणीला त्यांच्या आईनच मोठं केलं आहे. रोव्हमनचा जेव्हा जन्म देखील झाला नव्हता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. यासाठी त्यांनी जबरदस्तीनं प्रयत्न देखील केले होते. पण आईनं त्यांचं अजिबात ऐकलं नाही आणि मुलाला जन्म दिला. आज त्याच मुलानं आपल्या आईनं आणि देशाचं नाव काढलं आहे.
रोव्हमन आणि त्याची बहिण यांच्या शिक्षणासाठी आईनं शेजाऱ्यांच्या घरी धुणीभांडी देखील केली. रोव्हमन याचा जन्म वेस्ट इंडिजच्या जमैकामधील बेनिस्टेर डिस्ट्रिक्ट ऑफ ओल्ड हार्बरमध्ये झाला होता. कुटुंबात आई आणि लहान बहिण इतकंच कुटुंब.
नुकतंच वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू इयान बिशप यांनी सांगितलं की जेव्हा रोव्हमन माध्यमिक शाळेत शिकत होता तेव्हाच त्यानं आपल्या आईला एक वचन दिलं होतं. तुला या गरिबीतून मी नक्की बाहेर काढेन असं रोव्हमन त्याच्या आईला म्हणाला होता. तेच वचन पूर्ण करण्यासाठी रोव्हमननं खूप कष्ट घेतले. त्याची कहाणी खूप रंजक आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे. २०१९ साली रोव्हमन यानं स्वत:च्या कमाईतून घेतलेली कार गिफ्ट केली होती.
आपला मुलगा जितका खोडकर तितकाच समुजदार असल्याचं रोव्हमनच्या आईनं एका मुलाखतीत म्हटलं होतं. जेव्हा आपण एका संकटात असतो किंवा कामगिरी चांगली होत नसते तेव्हा मी स्वत:ला हेच समजावत असतो की तू स्वत:साठी नव्हे, तर आपल्या आई व बहिणीसाठी खेळत आहेस. हे तू त्यांच्यासाठी करत आहेस कारण तुझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, असं तो वारंवार स्वत:ला सांगत असतो. रोव्हमन यानं आपल्या आईलाच आपले वडील मानलं आहे.