IPL 2024: एकूण ५२३ धावा! १ सामना अन् ७ विक्रम; SRH vs MI सामन्यानं रचला इतिहास

IPL 2024 SRH vs MI Live Updates: हैदराबादने मुंबईला नमवून विजयाचे खाते उघडले.

आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आठव्या सामन्याचा 'आठवावा' प्रताप... या सामन्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. हैदराबादच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत विक्रमी २७७ धावसंख्या उभारली. अखेर हैदराबादने मुंबईला नमवून विजयाचे खाते उघडले.

सनरायझर्स हैदराबादने धावांचा डोंगर उभारल्यानंतर मुंबई इंडियन्सने खूप संघर्ष केला. सलामीवीर इशान किशन आणि त्यानंतर तिलक वर्मा यांनी अप्रतिम खेळी करून सामन्यात रंगत आणली.

पण तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला अपयश आले. हैदराबादने दिलेल्या २७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला घाम फुटला. मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ५ बाद २४६ धावा करू शकला आणि सामना ३१ धावांनी गमावला. २७८ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी चांगला संघर्ष केला.

हैदराबाद आणि मुंबई या सामन्यात एकूण ५२३ धावा झाल्या. मुंबईच्या संघाने २४६ तर हैदराबादने २७७ धावा कुटल्या.

सनरायझर्स हैदराबादच्या तीन फलंदाजांनी जलद अर्धशतक झळकावण्याची किमया साधली. ट्रॅव्हिस हेड (१८ चेंडू) अभिषेक शर्मा (१६ चेंडू) आणि हेनरिक क्लासेनने (२४) चेंडूत अर्धशतक झळकावले.

हैदराबादने उभारलेली २७७ ही धावसंख्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. तर, आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने २४६ धावा करून लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

खरं तर आयपीएलच्या एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार या सामन्यात पाहायला मिळाले. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ३८ षटकार ठोकले.

एका ट्वेंटी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक धावा सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात पाहायला मिळाल्या.

यजमान संघाकडून हेडने ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत ६२ धावा केल्या. तर अभिषेक शर्माने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २३ चेंडूत ६३ धावा कुटल्या. एडन मार्करम आणि हेनरिक क्लासेन यांनी देखील हात साफ केले.

एडन मार्करमने १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या, तर हेनरिक क्लासेनने ७ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ८० धावा कुटल्या आणि ऐतिहासिक धावसंख्या उभारली. यजमान हैदराबादने निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा केल्या होत्या.