IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी CSK मध्ये १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार?

Ayush Mhatre CSK Ruturaj Gaikwad, IPL 2025: ऋतुराजला १८ कोटींना रिटेन करणाऱ्या CSK संघाने आयुष म्हात्रेसाठी किती पैसे मोजले, जाणून घ्या

चेन्नई सुपर किंग्जला काही दिवसांपूर्वी एक मोठा धक्का बसला. त्यांचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाद झाला. त्याच्या जागी महेंद्रसिंग धोनीला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली.

ऋतुराज गायकवाड काही दिवसांत फिट होईल अशी आशा होती. पण आता मात्र त्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. चेन्नईने त्याच्या जागी मराठमोळ्या आयुष म्हात्रे याला संघात घेतले आहे. ऋतुराजचा बदली खेळाडू म्हणून त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.

ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीनंतर आयुषच्या काही टेस्ट घेण्यात आल्या आणि त्यानंतर झाल्यानंतर त्याची सीएसकेमध्ये निवड करण्यात आली. सीएसकेने १३ एप्रिल रोजी आयुष म्हात्रेला संघात समाविष्ट करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला.

१३ एप्रिलनंतर आयुषला ताबडतोब संघात सामील होण्यास सांगितले गेले आहे. पण, क्रिकबझच्या रिपोर्टनुसार आयुष पुढील दोन दिवसांत संघात सामील होऊ शकतो. सीएसकेच्या जवळच्या एका सूत्राने क्रिकबझला याबद्दल सांगितले.

सीएसके संघ सध्या हंगामातील ७वा सामना खेळण्यासाठी लखनौमध्ये आहे. यानंतर, ती २० एप्रिल रोजी हा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध मुंबईत सामना खेळणार आहे. आयुष हा विरारचा आहे. त्यामुळे तो मुंबईच्या सामन्यापासूनच संघात सामील होईल, असे बोलले जात आहे.

१७ वर्षांचा आयुष म्हात्रे हा एक उत्तम सलामीवीर आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या ९ सामन्यांमध्ये २ शतके आणि १ अर्धशतकासह ५०४ धावा केल्या आहेत. त्याने ७ लिस्ट ए सामन्यांमध्ये ४५८ धावा केल्या आहेत.

आयुषने लिस्ट ए फॉरमॅटमध्ये दोन शतके ठोकली आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आयुष म्हात्रेला भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडू म्हणून पाहिले जाते.

ऋतुराज गायकवाडला संघाने हंगाम सुरु होण्याआधी रिटेन केले होते. त्याला तब्बल १८ कोटींच्या मानधनावर संघात कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या जागी संघात आलेल्या आयुष म्हात्रेला किती पैसे मिळणार, हा प्रश्न अनेकांना पडला होता.

चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून निवड झालेल्या आयुष म्हात्रेला त्याच्या बेस प्राईजमध्ये विकत घेतले जाईल. लिलावादरम्यान आयुष म्हात्रेची मूळ किंमत ३० लाख रुपये होती. त्याच मूळ किमतीवर त्याला संघात सामील करून घेतले जाईल असे सांगितले जाते.