'Sun' रायझर्स हैदराबादसमोर RCB गरगरले! अफगाणिस्तानच्या विक्रमासह ६ मोठे पराक्रम मोडले

IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Live : IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे नाणे पुन्हा एकदा खणखणीत वाजले. ट्रॅव्हिस हेड ( १०२), हेनरिच क्लासेन ( ६७) यांनी तुफान फटकेबाजी केली. अभिषेक शर्मा, अब्दुल समद व एडन मार्करम यांनी हात मोकळे केले.

- नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्याचा पश्चाताप RCB चा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस याला नक्की झाला असेल. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा स्वतःचाच विक्रम आज तोडला. यासह त्यांनी ६ मोठे विक्रम मोडले...

- सनरायझर्स हैदराबादने ३ बाद २८७ धावा करून आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा स्वतःचाच विक्रम मोडला. याच आयपीएलमध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध ३ बाद २७७ धावा कुटल्या होत्या.

- आयपीएलच्या एका इनिंग्जमध्ये सर्वाधिक २२ षटकारांचा विक्रम आज SRH ने नावावर केला. त्यांनी २०१३चा RCB चा ( २१ षटकार वि. PWI) विक्रम मोडला.

- आयपीएलच्या एका पर्वात दोनवेळा २५० हून अधिक धावा करणारा SRH हा पहिला संघ ठरला, शिवाय एकाच पर्वात २७० हून अधिक धावांचा पराक्रमही त्यांनी नावावर केला.

- ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २८७ धावा या दुसऱ्या सर्वोच्च धावा ठरल्या. नेपाळने २०२३ मध्ये मंगोलियाविरुद्ध ३१४ धावा केल्या होत्या. SRH ने आज अफगाणिस्तानचा ( २७८ धावा वि. आयर्लंड, २०१९) विक्रम मोडला.

- आयपीएलच्या एका इनिंग्जमध्ये सर्वाधिक चौकार-षटकारांच्या विक्रमात SRH ने दुसरे स्थान पटकावताना लखनौ सुपर जायंट्सशी ( ४१ वि. PBKS, २०२३) बरोबरी केली. २०१३ मध्ये RCB vs PWI सामन्यांत बंगळुरूने ४२ चौकार-षटकार खेचले होते.