Join us  

माझ्या विकेटमुळे सामन्याला कलाटणी मिळाली...! हार्दिक पांड्या काय म्हणाला ऐका...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 11:21 PM

Open in App
1 / 6

राजस्थानने मुंबईला २० षटकांत १२५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. ट्रेंट बोल्टने त्याच्या पहिल्या दोन षटकांत रोहित शर्मा, नमन धीर व इम्पॅक्ट खेळाडू डेवॉल्ड ब्रेव्हिस यांना गोल्डन डकवर माघारी पाठवले. कर्णधार हार्दिक पांड्या ( ३४) व तिलक वर्मा ( ३२) यांनी ५६ धावांची भागीदारी करून डाव सावरला.

2 / 6

युझवेंद्र चहलने फिरकीची जादू दाखवली. बोल्टने ४-०-२२-३ अशी आणि चहलनेही ४-०-११-३ असी उल्लेखनीय स्पेल टाकली. इशान किशन ( १६) व टीम डेव्हिड ( १७) फार काही करू शकले नाही. मुंबई इंडियन्सला ९ बाद १२५ धावा करता आल्या.

3 / 6

क्वेना मफाकाने पहिल्या षटकात यशस्वी जैस्वाल ( १०) बाद केले. RR चा कर्णधार संजू सॅमसन व जॉस बटलर यांनी चांगले फटके मारले. आकाश मढवालच्या चेंडूवर संजू ( १२) दुर्दैवीरित्या बाद झाला. मढवालने MI ला आणखी एक यश मिळवून देताना बटलरला ( १३) बाद केले.

4 / 6

आर अश्विन व रियान पराग यांनी RR चा डाव सावरला. अश्विन १६ धावांवर माघारी परतल्यानंतरही परागने फटके बाजी सुरू ठेवली. रियानने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५४ धावा केल्या. शुबम दुबेने नाबाद ८ धावा केल्या आणि राजस्थानने १५.३ षटकांत ४ बाद १२७ धावा करून विजय मिळवला.

5 / 6

सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, 'आम्हाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. आजची रात्र आव्हानात्मक होती. आम्हाला १५० किंवा १६० धावांपर्यंत पोहोचण्याची संधी होती, परंतु माझ्या विकेटने सामन्याला कलाटणी मिळाली, असे मला वाटते. मी आणखी चांगले करू शकलो असतो.''

6 / 6

''खेळपट्टी गोलंदाजांसाठी मदत करणारी असणे चांगले आहे. हा खेळ गोलंदाजांसाठी खूप क्रूर आहे, परंतु आजचा खेळ अनपेक्षित होता. सामन्यात योग्यवेळी योग्य खेळ करणे महत्त्वाचे असते. निकाल काहीवेळेस आपल्या बाजूने लागतो, काहीवेळेस नाही. पण, मला संघावर विश्वास आहे आणि हा संघ पुनरागमन करेल. आम्हाला थोडे अधिक शिस्तबद्ध राहण्याची आणि खूप धैर्य दाखवण्याची गरज आहे',''असेही पांड्या म्हणाला.

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्सहार्दिक पांड्या