Big News : IPL 2024चे सामने परदेशात होण्याच्या मार्गावर; ३ मोठ्या इव्हेंट्समध्ये BCCIचं 'सँडविच'!

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या यशानंतर आता पुढील वर्षी जगातील सर्वात श्रीमंत लीग आणखी विक्रम रचण्यासाठी सज्ज झाली आहे, पण...

डिसेंबर २०२३ मध्ये त्यासाठी ऑक्शन होण्याचा अंदाज आहे आणि प्रत्येक फ्रँचायझीच्या पर्समधील रक्कम ९० वरून १०० कोटी करण्याचा विचार आहे. व्यासपीठ सज्ज होत असताना IPL 2024 चे काही सामने परदेशात खेळवले जाण्याची बातमी समोर येत आहे.

आयपीएल २०२४च्या वेळापत्रकात मोठे बदल पाहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, कारण ४ जूनपासून अमेरिका व वेस्ट इंडिज येथे संयुक्तपणे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलसाठी फार कमी वेळ मिळतोय. त्यात आणखी दोन समस्या बीसीसीआयसमोर आहेत.

२०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकींमुळे बीसीसीआयचे टेंशन वाढले आहे. आयपीएल २०२४ ही मार्च २२ ते १९ मे या कालावधीत होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याने काही सामने परदेशात हलवले जाण्याची शक्यता अधिक आहे.

मागच्या वर्षी आयपीएल ३१ मार्चपासून सुरू झालेली आणि २९ मे रोजी फायनल झाली होती. आयपीएल २०२३ ही ५८ दिवसांच्या विंडोत पार पडली होती. दोन महत्त्वांच्या स्पर्धांमूळे बीसीसीआयला यंदा आयपीएल फायनल १९ मे रोजी खेळवावी लागणार आहे.

''आम्हाला या परिस्थितीची कल्पना आहे. इंग्लंड मालिका, लोकसभा निवडणुक आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अशा महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत. पण, याबाबत आताच भाष्य करणं अवघड आहे. याबाबतचा निर्णय डिसेंबर-जानेवारी मध्ये घेतला जाईल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

इंग्लंडचा संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येतोय आणि २५ जानेवारी ते ११ मार्च या कालावधीत ही मालिका होणार आहे. त्यानंतर ११ दिवसांनी आयपीएल २०२४ सुरू होईल, परंतु मे-जून महिन्यात लोकसभा निवडणुकांचा अंदाज असल्याने त्या दरम्यानचे सामने परदेशात हलवले जाऊ शकतात. ४ ते ३० जून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असल्याने आयपीएलसाठी कमी दिवसाचा कालावधी मिळणार आहे.

२०१४ मध्ये बीसीसीआयला आयपीएलचे काही सामने परदेशात खेळवावे लागले होते आणि २००९मध्ये तर संपूर्ण आयपीएल परदेशात झाली होती. या दोन्हीवेळेस लोकसभा निवडणुकांमुळे हे बदल झाले होते. अशीच परिस्थिती २०२४ मध्ये असेल आणि अशात आयपीएलचे काही सामने संयुक्त अरब अमिरातीत होण्याचा अंदाज आहे.