१६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुबमन गिल, वृद्धीमान सहा व हार्दिक पांड्या माघारी परतल्यानंतर तामीळनाडूचा फलंदाज साई सुदर्शनने चौथ्या विकेटसाठी इम्पॅक्ट खेळाडू विजय शंकरसह ५३ आणि डेव्हिड मिलरसह सहाव्या विकेटसाठी ५६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
साई सुदर्शनने ४८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६२ धावा केल्या. गुजरातने ६ विकेट्स राखून सामना जिंकला. एनरिच नॉर्खिया सारख्या अनुभवी गोलंदाजाला सुदर्शनने सुरेख फटके मारले. त्याने मारलेले दोन्ही षटकार हे यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून टोलावलेले होते. त्याच्या खेळीने आज सर्वांना मंत्रमुग्ध केले.
२१ वर्षीय साई सुदर्शन हा डावखुरा फलंदाज आहे आणि आयपीएल २०२२ मध्ये त्याला २० लाखांच्या मुळ किमतीत गुजरात टायटन्सने आपल्या ताफ्यात घेतले. २ कोटी किंमत असलेल्या केन विलियम्सनपेक्षा साईची किंमत दहापट कमी आहे, परंतु आजची त्याची कामगिरी केनच्या किंमतीवरही भारी पडली आहे.
तामीळनाडू प्रीमिअर लीग २०२१मध्ये साई सुदर्शनने ८ डावांत ७१.६०च्या सरासरीने ३५८ धावा केल्या होत्या आणि त्या पर्वात तो दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. साई सुदर्शनचे वडील भारद्वाज यांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि आई उषा भारद्वाज यांनी व्हॉलीबॉलमध्ये तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले आहे. पण, हा क्रिकेटच्या प्रेमात पडला.
आयपीएल २०२२ पर्यंत पोहोचण्यासाठी, साई सुदर्शनने प्रथम वयोगटातील क्रिकेटमध्ये धावा करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याला यशस्वी जैस्वालसह २०१९-२० साली १९ वर्षांखालीली चॅलेंजर ट्रॉफीमध्ये भारत अ संघासाठी सलामीची संधी मिळाली.
साई सुदर्शन गरज असेल त्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करू शकतो. तो लेगस्पिनरही आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळल्या गेलेल्या बंगालविरुद्धच्या सामन्यात मुरुगन अश्विनच्या अनुपस्थितीत संघाला लेगस्पिनरची गरज असताना त्याने गोलंदाजी करून विकेट घेतली होती.