आम्ही सुपरस्टार घडवतो, त्यामागे प्रचंड मेहनत आहे! Rohit Sharma ने अप्रत्यक्षपणे हार्दिकला सुनावले

IPL 2023, Rohit Sharma Interview : मुंबई इंडियन्सचा संघ आज एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना करणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबईचे पारडे जड मानले जात आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच जेतेपदं मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत. पण, ही जेतेपदं जिंकणं तितकं सोपं नव्हतं, असं MI चा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.

आयपीएलचा प्रत्येक हंगाम हा नवा असतो आणि तुम्हाला पहिल्यापासूनच सुरुवात करावी लागते. मुंबई इंडियन्सने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यापैकी बरेच खेळाडू भारतासाठीही खेळले. यामागे संघाच्या स्काऊटिंग टीमचा खूप मोठा वाटा आहे, असेही रोहित म्हणाला.

काही दिवसांपूर्वी MI चा माजी आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने मुंबई इंडियन्सकडे चॅम्पियन्स खेळाडू आहेत आणि त्याचा फायदा त्यांना होतो, असे म्हणाला होता. युवा खेळाडूंबाबतचा प्रश्न समोर येताच, रोहितने दिलेलं उत्तर हे हार्दिकसाठी असल्याची चर्चा सुरू आहे.

तो म्हणाला,''तो म्हणाला तुम्हाला खेळाडूंच्या पाठिशी उभं राहावं लागतं आणि तसं त्यांच्यासोबत नातं निर्माण करावं लागतं. यानेच एकमेकांबाबतचा विश्वास निर्माण होतो. त्यानंतर त्यांच्यासोबत मुक्तपणे बोलता येते आणि युवा खेळाडूंनी माझ्याकडे त्यांची समस्या घेऊन यावं, असं मला वाटतं. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या यांचीही अशीच कथा आहे. आता तिलक वर्मा व नेहर वढेरा त्या फेजमध्ये आहेत. दोन वर्षांनंतर तिलक व नेहल यांना लोकं सुपरस्टार म्हणून ओळखतील. हे दोन खेळाडू मुंबई आणि भारतीय क्रिकेटचं भविष्य आहेत.''

''ऑक्शनमध्ये सर्व सुपरस्टार उपलब्ध होते. पण फ्रँचायझीने बुमराह, अक्षर, कृणाल आणि हार्दिक यांचं स्काऊटिंग केलं. त्यांच्या यशाचे श्रेय हे आमचो प्रशिक्षक व स्काऊट यांना जातं. सुपर स्टार टीम आहे.... त्याला सुपरस्टार फ्रँचायझीनं बनवलं... या खेळाडूंना आम्ही खरेदी केलं, स्काऊट टीमनं दिवसरात्र मेहनत घेतली,''असेही रोहित म्हणाला.

त्याने पुढे सांगितले की,''आमची टीम हार्दिक व अक्षर यांच्यासाठी अहमदाबादला गेली. हार्दिक व कृणाललाही आमच्या स्काऊट टीमनं त्यांच्यासाठी मेहनत घेतली. अन्य फ्रँचायझीमध्येही खेळाडू खेळतात, परंतु खेळाडूंकडून सर्वोत्तम करून घेण्याचं काम आमच्या फ्रँचायझीनं केलं. त्यामुळे हा सुपरस्टार्सचा संघ आहे, असं लोकं सहज म्हणतात. पण, त्यामागे मेहनत आहे यार.''