फॅफ ड्यू प्लेसिस आणि विराट कोहली या दोघांनी ९८ चेंडूंत १३७ धावांची भागीदारी केली. विराट ४७ चेंडूंत ५९ धावांवर बाद झाला. फॅफ ५६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून ८४ धावांवर बाद झाला. RCB ला ४ बाद १७४ धावांवर समाधान मानावे लागले. पंजाबच्या हरप्रीत ब्रारने दोन विकेट्स घेतल्या.
यजमान पंजाब किंग्सची हालत सुरुवातीलाच खराब झाली होती. विराट कोहलीने ( Virat Kohli) दोन अचूक DRS घेतले, मोहम्मद सिराजने धक्के दिले अन् क्षेत्ररक्षणात भन्नाट रन आऊटही केला. पंजाबचा निम्मा संघ ७६ धावांवर तंबूत परतला होता.
कर्णधार सॅम करन व प्रभसिमरन सिंग यांनी ३३ धावा जोडताना पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, करनला अतिआत्मविश्वास नडला. एक धाव घेण्याची घाई त्याने केली आणि तो आरामात पळताना दिसला. वनिंदूने अचूक थ्रो करून करनला ( १०) रन आऊट केला. पंजाबचा निम्मा संघ ७६ धावांत माघारी परतला.
प्रभसिमरन ( ४६) पंजाब किंग्ससाठी आशेचा किरण बनला होता, परंतु वेन पार्नेलच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. हरप्रीत ब्रार व जितेश शर्मा हीच अखेरची आशा PBKSला होती. हर्षल पटेलने १७व्या षटकात ७ धावा दिल्या. विराटने जितेशला झेल टाकला. तेव्हा जितेश ३८ धावांवर खेळत होता आणि ही चूक बंगळुरूला महागात पडली असती.
मोहम्मद सिराजने १८व्या षटकात हरप्रीत ब्रार ( १२) आणि नॅथन एलिसचा त्रिफळा उडवला. हर्षल पटेलने अखेरची विकेट घेताना जितेशला ४१ धावांवर ( २७ चेंडू) माघारी पाठवले. पंजाबचा संपूर्ण संघ १५० धावांवर तंबूत परतला अन् बंगळुरूने २४ धावांनी सामना जिंकला. सिराज ४-२१ अशी कामगिरी केली.