आयपीएल २०२२साठी फ्रँचायझीने जडेजाला MS Dhoni पेक्षा अधिक रक्कम देऊन संघात कायम राखले. त्यानंतर पर्वाच्या सुरुवातीला धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला व ती जबाबदारी रवींद्र जडेजाकडे आली. पण, जडेजाला त्याचे नेतृत्व कौशल्य सिद्ध करता आले नाही. त्यामुळे संघ मॅनेजमेंटने मध्यंतरालाच जडेजाकडून कर्णधारपद काढून घेतले आणि धोनी पुन्हा पिक्चरमध्ये आला.
रवींद्र जडेजावर दडपण येऊन त्याचा खेळ खराब होत असेल तर त्याला या जबाबदारीतून मुक्त करायला हवं, असं तेव्हा धोनी म्हणाला होता. त्यानंतर रवींद्र जडेजा व चेन्नई सुपर किंग्स यांच्यातला दुरावा सुरू झाला. मागील पर्वानंतर जडेजा व CSK यांच्यात काहीच संवाद झाला नसल्याचे TOI ने सांगितले.
रवींद्र जडेजाने आयपीएल २०२३त CSK कडून न खेळण्याचाच निर्णय घेतल्याचे जवळपास पक्के केले आहे आणि त्याचा मॅनेजर सध्या अन्य फ्रँचायझींशी चर्चा करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. कर्णधारपदावरून काढल्यानंतर जडेजाने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यानंतर तो NCA त गेला, परंतु त्याने दुखापतीबाबत CSK ला काहीच अपडेट्स दिले नाहीत.
रवींद्र जडेजाने सोशल मीडियावरील CSK संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या. महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या CSK च्या व्हिडीओतूनही जडेजा गायब होता.
२००८मध्ये जडेजा राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता. तेव्हा शेन वॉर्नने त्याला रॉकस्टार हे टोपण नाव दिले होते. २०१२च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सन ९.८ कोटींत त्याला आपल्या ताफ्यात घेतले आणि त्या लिलावातील तो महागडा खेळाडू ठरला होता. जडेजाने २१० आयपीएल सामन्यांत २५०२ धावा व १३२ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलच्या नियमानुसार फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूचे नाव TRADING WINDOW साठी रजिस्टर करते. एखाद्या खेळाडूला स्वतःहून ट्रेडिंग विंडोत नाव नोंदवता येत नाही. त्यामुळे त्याला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो CSKच्या मॅनेजमेंटसोबत चर्चा करूनच घ्यावा लागेल.