१२ सामन्यांत ८ पराभवांमुळे दिल्लीचे आव्हान संपुष्टात आले. पंजाब किंग्सने आज त्यांना पराभूत करून प्ले ऑफच्या शर्यतीतून एक स्पर्धक बाहेर फेकला.. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून त्यांनाही प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाद केले आहे.
पंजाब किंग्सने आजच्या विजयासह खात्यातील गुणसंख्या १२ केली व सहाव्या क्रमांकावर झेल घेतली. राजस्थान रॉयल्सच्या खात्यातही १२ गुण आहेत. गुजरात टायटन्स ( १६), चेन्नई सुपर किंग्स ( १५), मुंबई इंडियन्स ( १४) व लखनौ सुपर जायंट्स ( १३) हे आघाडीवर आहेत.
१० संघांचा समावेश असलेल्या लीगमध्ये १६ किंवा त्यापेक्षा अधिक गुण कमावणारा संघ प्ले ऑफमध्ये पात्र ठरेल हे निश्चित आहे. गुजरात टायटन्सने त्यांची जागा पक्की केली आहे, परंतु त्यांना टॉपला राहून क्वालिफायर १ मध्ये जागा निश्चित करायची आहे. त्यांचे आणखी दोन सामने ( वि. SRH आणि वि. RCB) शिल्लक आहेत आणि त्यापैकी एक विजय पुरेसा आहे
चेन्नई सुपर किंग्स १५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यांचेही दोन सामने ( वि. KKR आणि वि. DC) आहेत. हे दोन्ही सामने जिंकून तेही क्वालिफायर १ च्या स्पर्धेत स्वतःला कायम राखण्याच्या प्रयत्नात आहेत.
मुंबई इंडियन्सच्या मार्गात लखनौ सुपर जायंट्स व सनरायझर्स हैदराबाद आहे. मुंबईला दोन्ही सामने जिंकून क्वालिफायर १ मध्ये येण्याची संधी आहे
लखनौ सुपर जायंट्स १३ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि त्यांना मुंबई व कोलकाताचा सामना करायचा आहे. यापैकी एकही मॅच गमावणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स यांच्या खात्यात प्रत्येकी १२ गुण आहेत आणि त्यांना दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. लखनौ व मुंबईचा पराभव त्यांना आवश्यक असेल. पंजाबला RR व DC आणि RRला RCB व PBKS चा सामना करायचा आहे. यामधील RR vs PBKS हा सामना महत्त्वाचा आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व सनरायझर्स हैदराबाद यांचे प्रत्येकी तीन सामने आहेत. १० गुण असलेल्या RCBला उर्वरित तीन सामन्यांत RR, SRH व GT चा सामना करायचा आहे आणि या सर्व लढती जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. यापैकी एकही हार त्यांचा मार्ग बंद करेल.
हैदराबादच्या खात्यात ८ गुण आहेत आणि उर्वरित तीन सामने जिंकूनही ते प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता धुसर आहे.