राजस्थान रॉयल्सचे फटके, मुंबई इंडियन्सला 'चटके'! Play Off च्या शर्यतीतून KKR ९५% OUT!

IPL 2023 Play Off Scenario, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सने आज इडन गार्डनवर तुफान फटकेबाजी केली अन् त्याचे चटके मात्र मुंबई इंडियन्सला सहन करावे लागले. राजस्थानने यजमान कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवताना Point Table मध्ये मोठी अदलाबदल केली आहे.

यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) आणि संजू सॅसमन यांनी आज इडन गार्डन गाजवले. या दोघांनी ७० चेंडूंत १२१ धावांची भागीदारी करून राजस्थान रॉयल्सला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. कोलकाता नाइट रायडर्सचे १५० धावांचे लक्ष्य RR ने १३.१ षटकांत सहज पार केले.

वेंकटेश अय्यर ( ५७ ) वगळल्यास KKRकडून कोणाला फार कमाल करता आली नाही. RRच्या गोलंदाजांनी कमाल केलीच, परंतु त्यांना खेळाडूंनी अफलातून झेल व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून दर्जेदार साथ दिली. युजवेंद्र चहलने ४ विकेट्स घेताना आयपीएल इतिहासात सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम नावावर केला. कोलकाताला ८ बाद १४९ धावांवर समाधान मानावे लागले.

यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात २६ धावा कुटल्या. हर्षित राणाच्या दुसऱ्या षटकात जेसन रॉय ( ०) रन आऊट झाला, परंतु यशस्वीने शेवटच्या दोन चेंडूंवर त्यालाही झोडले. यशस्वीने १३ चेंडूंत अर्धशतक झळकावताना आयपीएल इतिहासातील वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. संजूने २९ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४८ धावा केल्या. यशस्वीने ४७ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ९८ धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सने आजच्या विजयानंतर Point Table मध्ये मुंबई इंडियन्सला मागे ढकलून तिसऱ्या स्थानी झेप घेतली. १२ सामन्यातील RRचा हा सहावा विजय ठरला अन् १२ गुण व +०.६३३ नेट रन रेटसह त्यांनी तिसऱ्या स्थानी झेप घेतली. मुंबईचे ११ सामन्यांत १२ गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट हा -०.२५५ असा आहे

गुजरात टायटन्स ( १६) व चेन्नई सुपर किंग्स ( १५) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांना प्ले ऑफमधील स्थान पक्क करण्यासाठी एक विजय पुरेसा आहे. तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी कडवी टक्कर आहे. ११ गुणांसह लखनौ सुपर जायंट्सही या शर्यतीत आहेत.

आजच्या पराभवाने कोलकाता नाइट रायडर्स ( १२ सामने ५ विजय ७ पराभव १० गुण) ९५ टक्के प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स यांचेही प्रत्येकी १० गुण आहेत, परंतु त्यांच्या हातात ३ सामने अजून आहेत. दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद याचे आव्हान केव्हाच संपल्यात जमा आहे.