२०१८नंतर प्रथमच चेपॉकवर होत असलेला सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये गर्दी केलीच होती, शिवाय साऊथचे स्टार शिवाकार्तिकेयन, सतिश यांच्यासह आघाडीची अभिनेत्री साध्या लूकमध्ये स्टेडियमवर हजर होती आणि तिने चेन्नईच्या विजयाचा आनंद लुटला.
डेव्हॉन कॉनवे ( ४७) व ऋतुराज गायकवाड ( ५७) यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. शिवम दुबेने २७ धावा आणि मोईन अली १९ धावा करून बाद झाले. MS Dhoniने ३ चेंडूंत १२ धावा केल्या. अंबाती रायुडू १४ चेंडूंत २७ धावांवर नाबाद राहिला आणि चेन्नईने ७ बाद २१७ धावा केल्या. रवी बिश्नोई व मार्क वूड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
फॉर्मात असलेल्या कायले मायर्स आणि लोकेश राहुल यांनी ७९ धावांची भागीदारी करून LSG ला चांगली सुरुवात करू दिली. मायर्स २२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांवर बाद झाला. मोईन अलीने ४ विकेट्स घेत सामना फिरवला. मिचेल सँटनरनेही एक महत्त्वाची विकेट घेतली.
निकोलस पूरन मैदानावर असल्याने LSGला आशा होत्या, परंतु तुषार देशपांडेने १६व्या षटकात पूरनला ३२ ( १८ चेंडू) धावांवर माघारी पाठवले. राजवर्धन हंगरगेकर व तुषार यांनी अखेरच्या षटकात टिच्चून मारा करताना चेन्नईचा विजय पक्का केला.
तुषारने २०व्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करून आयुष बदोनीला ( २३) बाद केले. लखनौला ७ बाद २०५ धावा करता आल्या आणि चेन्नईने १२ धावांनी सामना जिंकला. तुषारने ४५ धावांत २ महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या किर्थी सुरेश या आघाडीच्या अभिनेत्रीच्या साधेपणाने सर्वांचे मन जिंकले.