लखनौच्या दीपक हुडा व आयूष बदोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने १५९ धावांचे लक्ष्य उभे केले. हार्दिक व मॅथ्यू वेडने गुजरातला विजयाच्या मार्गावर ठेवले होते, परंतु दोघंही लागोपाठ माघारी परतले. लखनौचे पारडे जड वाटत असताना राहुल तेवातिया ( Rahul Tewatia) डेव्हिड मिलरसह बाजी पलटवली. या दोघांनी ३४ चेंडूंत ६० धावांची भागीदारी केली. त्यानंतर अभिनव मनोहरने सामना संपवला. गुजरातला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला.
मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) तीन विकेट्स घेत लखनौची अवस्था ४ बाद २९ अशी केली होती हुडा व बदोनी यांनी लखनौच्या डावाला आकार दिला आणि ६८ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली. हुडा ४१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा करून माघारी परतला. बदोनीने ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. LSG ने ६ बाद १५८ धावा केल्या.
प्रत्युत्तरात मैदानावर आलेल्या गुजरात टायटन्सना १५ धावांवर दोन धक्के बसले. मॅथ्यू वेड व कर्णधार हार्दिक यांनी ४८ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. २८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३३ धावा करणारा हार्दिकचा झेल मनीष पांडेने पकडला. दीपकने पुढील षटकात गुजरातला मोठा धक्का दिला. वेड ३० धावांवर त्रिफळाचीत झाला.
गुजरातला ३० चेंडूंत ६८ धावा करायच्या होत्या. त्यानंतर राहुल तेवातिया व डेव्हिड मिलर यांनी हात मोकळे केले आणि दीपकने टाकलेल्या १६ व्या षटकात २२ धावा चोपल्या. रवी बिश्नोईच्या पुढच्याच षटकात तेवातियाने १८ धावा चोपल्या.
गुजरातला १८ चेंडूंत २९ धावा करायच्या होत्या. पण, आवेश खानने ही भागीदारी संपुष्टात आणली. मिलर २१ चेंडूंत ३० धावा करून बाद झाला. अखेरच्या ६ चेंडूंत गुजरातला ११ धावा करायच्या होत्या आणि नवखा अभिनव मनोहर स्ट्राईकवर होता. पण, त्याने सलग दोन चेंडू चौकार खेचले.
राहुल तेवातियाच्या फटकेबाजीवर एक तरुणी स्टेडियमवर खूपच जल्लोष करताना दिसली. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच हिच्या शेजारी बसलेली ही तरुणी कोण याची सर्वांना उत्सुकता लागली होती.
ती तरुणी राहुलची पत्नी रिधी तेवातिया आहे. ३० नोव्हेंबर २०२१मध्ये या दोघांनी लग्न केलं. राहुलच्या पत्नीचे नाव रिद्धी पन्नू आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.