IPL 2022चा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे तर स्पर्धेची फायनल २९ मे रोजी होणार आहे. सलामीचा सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत कोणता संघ हिरो ठरेल आणि कोणता संघ झिरो ठरेल, याचा अंदाज सुनील गावसकर यांनी वर्तवला.
यंदाच्या हंगामात एकूण १० संघ असून लखनौ आणि गुजरात हे दोन नवे संघही सामील झाले आहेत. जुन्या ८ पैकी तीन संघ असे आहेत, ज्यांनी आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावलेले नाही. त्यात दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण पाच संघांना पहिलंवहिलं विजेतेपद पटकावण्याची संधी आहे.
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी यासंदर्भात एक महत्त्वाचे विधान केले. या वेळच्या मेगा लिलावात अनेक संघांनी विचारपूर्वक खर्च करून सर्वोत्तम खेळाडू खरेदी केले आहेत. पण काही संघांकडून अजिबातच अपेक्षा ठेवण्याची गरज नाही, असं रोखठोक विधान गावसकरांनी स्पोर्ट्स तकमध्ये बोलताना व्यक्त केलं.
हा संघ ठरेल हिरो - 'रिषभ पंतने गेल्या वर्षीपर्यंत कर्णधारपदाचा घेतलेला अनुभव यंदा त्याला चांगलाच उपयोगी पडेल. त्यांला खूप आत्मविश्वासही मिळेल. गेल्या दीड वर्षांपासून त्याचा टीम इंडियातील फॉर्मही चांगलाच सुरू आहे. हे सारं त्याच्या संघासाठी खूप उपयुक्त ठरेल', असं मत गावसकरांनी व्यक्त केलं.
'दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी निवडलेले खेळाडू आणि त्यांनी स्वतःसाठी उभे केलेले पर्याय यामुळे हा संघ खूप मजबूत झाला आहे. त्यामुळे हा संघ स्पर्धेचा हिरो ठरण्याची आणि पहिलं जेतेपद पटकावण्याची दाट शक्यता आहे', अशी भविष्यवाणी गावसकरांनी व्यक्त केली.
याशिवाय, या स्पर्धेत सर्वात वाईट कामगिरी कोणत्या संघाकडून केली जाऊ शकते, याबद्दलही गावसकरांनी अंदाज वर्तवला. गावसकरांच्या मते कोणता संघ झिरो ठरेल, ते पाहूया.
'पंजाब किंग्स (Punjab Kings) या संघाला आतापर्यंत जेतेपद पटकावता आलेले नाही. या मोसमात त्यांनी फारसे विशेष खेळाडू निवडलेले दिसत नाहीत. त्यामुळे त्यांची कामगिरी खराब होण्याची दाट शक्यता आहे. पण याउलट, त्यांच्याकडून लोकांना कमी अपेक्षा आहेत (Underdogs). त्यामुळे अशा परिस्थितीत न घाबरता नवा कर्णधार मयंक अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली मुक्तपणे खेळू शकतो', असं गावसकर म्हणाले.