Mumbai Indians, IPL 2022 : आम्ही सांघिक खेळ करण्यात अपयशी ठरलो, मुंबई इंडियन्सचे फलंदाज प्रशिक्षक Robin Singh ने वाचला चुकांचा पाढा!

Mumbai Indians Batting Coach Robin Singh - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात ( IPL 2022) पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे.

Mumbai Indians Batting Coach Robin Singh - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात ( IPL 2022) पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे. मुंबईने आतापर्यंत झालेले आठही सामने गमावले आहेत आणि त्यामुळे त्यांचे स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्याची शक्यता मावळली आहे. अशात शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या लढतीपूर्वी मुंबई इंडियन्सचे फलंदाज प्रशिक्षक रॉबिन सिंग यांनी MIच्या चुकांचा पाढा वाचला.

डी. वाय. पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीच्या पूर्वसंध्येला रॉबिन सिंग म्हणाला, ''आम्ही सांघिक कामगिरी करण्यात अपयशी ठरलो आणि हे उघड आहे. आम्ही आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांत आमची कामगिरी तुकड्या-तुकड्यांत झाली. एकसंघ कामगिरी करता आली नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी यात सातत्य राखता आले नाही. हा २० षटकांचा नव्हे तर ४० षटकांचा प्रश्न आहे आणि आम्हाला योग्य समन्वय जुळवता आले नाही. पुढे ते जुळवू अशी अपेक्षा आहे.''

''चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करण्याच्या जवळ पोहोचलो होतो, परंतु दुर्दैवाने आम्ही तो सामना गमावला. हा खेळाचाच एक भाग आहे आणि याची आम्हाला कल्पना आहे. उत्तम कामगिरी करणे, हाच पुढे जाण्याचा मंत्र आहे. आम्ही त्यासाठी समस्यांचे निराकरण केले आहे आणि आता आम्हाला जिंकायचे आहे. आमच्यात अजूनही जिंकण्याची भूक कायम आहे आणि फ्रँचायझीचा अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याची आमची इच्छा आहे,''असेही रॉबिन सिंग म्हणाला.

संघात काही बदल करावे लागतील हे रॉबिन सिंगने मान्य केले. तो म्हणाला,''आम्ही चांगली कामगिरी केलेली नाही हे आम्हालाही ठाऊक आहे. आता या परिस्थितीत सु ठीच  आमचा प्रयत्न आहे. जिथे सुधारणा करण्याची गरज आहे, त्याचा आढावा आम्ही घेतला आहे. इशान किशनेने सुरुवात चांगली केली, पण नंतर तो काहीसा मागे पडला. आम्ही एक प्रकारे आतापर्यंतच्या स्पर्धेचा फेरआढावा घेतला. आम्ही काही गोष्टींबाबत विचारमंथन केले. इशानने ज्या प्रकारे सुरुवात केली तसाच फॉर्म तो परत मिळवेल अशी आशा आहे.''

कर्णधार रोहित शर्मा बाबत तो म्हणाला,'' रोहितने बरीच मेहनत घेतली आहे. आम्ही नेटमध्ये तसेच मैदानावर त्याच्याबरोबर बराच वेळ घालवला आहे. इशानप्रमाणेच रोहितने काय करायला हवे याचा आढावा आम्ही घेतला आहे. रोहितला त्याच्यावरील जबाबदारीची जाणीव आहे. त्याने सुद्धा सुधारणा करण्याची गरज असल्याचे ओळखून पुढाकार घेतला असून तो भक्कम पुनरागमन करेल याची पक्की खात्री आहे.''