त्याला पंजाब किंग्सने ( Punjab Kings) आपल्या ताफ्यात घेतले. पण, याच लिलावात भारताच्या युवा प्रतिभावान खेळाडूंवरही बोली लागलेली दिसत आहे. पहिल्या दिवशी टॉप टेन महागड्या खेळाडूंमध्ये सहा भारतांचा समावेश होता. आयपीएलने युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याचे हक्काचे व्यासपीठ दिले, शिवाय आर्थिक स्थैर्यही दिले. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चेतन सकारिया ( Chetan Sakariya)....
गुजरातच्या भावनगर येथील या मुलाने आज कोट्यवधींची झेप घेतली आहे. त्याचे वडील रिक्षा चालक होते आणि मुलाचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. हा श्रीमंताचा खेळ आहे, अस ते त्याला सांगायचे.
पण, चेतनने निर्धार सोडला नाही. १७ वर्षाचा असताना त्याच्या काकांनी त्याला साथ दिली, परंतु दोघांमध्ये डील झाली आणि काकांनी त्यांच्या बिझनेसमध्ये त्याला पार्ट टाईम काम करण्यास सांगितले व त्यातून क्रिकेटचा खर्च उचलण्यास सांगितले. काकांचा हा विश्वास चेतनने ढासळू दिला नाही.
त्यानं सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्रच्या १९ वर्षांखालील संघात स्थान पटकावले. त्यानंतर कूच बिहार स्पर्धेत ६ सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या, कर्नाटकविरुद्ध त्याने ८४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्याला MRF Pace Foundation मध्ये पाठवले.
तेथे जाण्यासाठी त्याच्याकडे बुटही नव्हती. भारताचा क्रिकेटपटू शेल्डन जॅक्सन याने त्याला मदत केली. २०१८-१९ च्या रणजी करंडक स्पर्धेत त्याला गुजरातकडून पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यात त्याने २९ विकेट्स घेतल्या. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही त्याने ५ सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या.
एव्हाना आयपीएल फ्रँचायझीचीही त्याच्यावर नजर पडलीच होती. २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला नेट बॉलर म्हणून सोबत नेले आणि २०२०च्या मिनी ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला १.२ कोटींत खरेदी केले.
ऑक्शनच्या बरोबर आधी त्याच्या भावाने आत्महत्या केली होती, परंतु घरच्यांनी ही गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली. तेव्हा तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळत होता. आयपीएलमध्ये त्याने पंजाब किंग्सविरुद्ध ३१ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्यात मयांक अग्रवाल, लोकेश राहुल व झाय रिचर्डसन या फलंदाजांचा समावेश होता. मागच्या वर्षी त्याचे वडील कांजीभाई यांचं कोरोनामुळे निधन झालं.
आज त्याला दिल्ली कॅपिटल्सने ४.२० कोटींत खरेदी केलं. राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी प्रयत्न केले होते.