आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कारण संघातील चार महत्वाचे परदेशी खेळाडू दुखापती आणि कोरोनाच्या संकटामुळे मायदेशी परतले आहेत.
राजस्थानच्या संघाचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे यंदाच्या सीझनचा एकही सामना खेळू शकला नाही. तर अष्टपैलू बेन स्टोक्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचा लियाम लिव्हिंगस्टोन देखील गेल्याच आठवड्यात इंग्लंडला रवाना झाला. बायो बबलच्या नियमांचा त्रास होत असल्यानं त्यानं माघारी परतण्याचा निर्णय घेतला.
तीन महत्वाचे परदेशी खेळाडू मायदेशी परतले असताना आता अँड्रू टाय यानंही भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात आता फक्त चार परदेशी खेळाडू उरले आहेत आणि त्यांनाच घेऊन संघाला आता उर्वरित संपूर्ण स्पर्धा खेळावी लागणार आहे. यात मिस्तफिजुर रेहमान, डेव्हिड मिलर, जोस बटलर आणि ख्रिस मॉरिस या चौघांनाच घेऊन संघाला पुढची वाटचाल करावी लागणार आहे.
त्यामुळे राजस्थान रॉयल्सनं आता 'लोन'वर इतर संघातील परदेशी खेळाडू देण्याची विनंती केली आहे. आयपीएलच्या नियमांनुसार स्पर्धेचा २० वा सामना झाल्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारपर्यंत संघांना 'लोन'वर प्रतिस्पर्धी फ्रँचायझीमधील खेळाडू घेता येणार आहेत.
नियमांनुसार एखाद्या संघातील खेळाडू दोन पेक्षी कमी सामन्यांमध्ये खेळला असेल तर त्याला इतर संघाकडून खरेदी केलं जाऊ शकतं. पण त्यासाठी संबंधित खेळाडूची तयारी असणं अतिशय महत्वाचं आहे. याशिवाय, ज्या फ्रँचायझीकडून खेळाडूला लोनवर खरेदी केलं जाणार आहे. त्या फ्रँचायझी विरोधातील सामन्यात तो खेळाडू खेळू शकणार नाही. पण इतर सर्व संघांविरोधातील सामन्यात खरेदीदार संघाला खेळाडूला खेळवता येईल.
याशिवाय, कोणत्याही फ्रँचायझीला त्यांच्याकडील खेळाडूंपैकी तीनहून अधिक खेळाडूंना एकाच फ्रँचायझीला 'लोन'वर देता येणार नाही.
राजस्थान रॉयल्स आता संकटात सापडल्यामुळे संघानं लोनवर खेळाडू घेण्यासाठीची लेखी विनंती एका फ्रँचायझीकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे. ''राजस्थान रॉयल्सकडून आम्हाला लोनवर खेळाडू देण्याबाबतचं विनंती पत्र दोन दिवसांपूर्वीच आलं आहे. पण त्याबाबत संघ व्यवस्थापनानं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही', असं एका फ्रँचायझीच्या सीईओने सांगितलं आहे.
राजस्थान रॉयल्सकडून इतर फ्रँचायझीचे खेळाडू विकत घेतले जाणार असल्याचं वृत्त आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे स्पर्धेतील २० वा सामना झाल्यानंतर राजस्थानच्या ताफ्यात नेमके कोणते खेळाडू दाखल होणार आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे.