ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जोश हेझलवूड ( Josh Hazlewood ) यानं आगामी आयपीएल २०२१मधून माघार घेतली आहे. ऑगस्ट २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत ३० वर्षीय गोलंदाज बायो-बबलमध्ये होता. त्यामुळे आता मानसिक आणि शारीरिक कणखर बनवण्यासाठी स्वतःला वेळ देण्याचा त्यानं निर्णय घेतला आहे.
१ एप्रिलला हेझलवूड भारतात येणार होता. ''१० महिने बायो-बबलमध्ये व क्वारंटाईन मध्ये होतो. त्यामुळे मी क्रिकेटपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि पुढील दोन महिने ऑस्ट्रेलियात घरच्यांना वेळ देण्याचं मी ठरवले आहे,''असे हेझलवूडनं सांगितले.
तो पुढे म्हणाला,''पुढे व्यग्र आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आहेच. वेस्ट इंडिजचा दौरा, त्यानंतर बांगलादेशमध्ये ट्वेंटी-२० मालिका, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, अॅशेस असे १२ महिने क्रिकेट आहेत. त्यामुळे राष्ट्रीय संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न आहे.''
आता चेतेश्वर पुजारा का होतोय ट्रेंड?- टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चेतेश्वर पुजाराची अभेद्य भींत तोडण्यात जोश हेझलवूडला अपयश आलं होतं. पुजाराच्या डिफेन्ससमोर हेझलवूड हतबल झाला होता.
CSKच्या नेट्समध्येही पुजाराला गोलंदाजी करावी लागेल म्हणून हेझलवूडनं माघार घेतली, असा तर्क नेटिझन्स लावत आहेत आणि त्यामुळे पुजारा ट्रेंड सुरू आहे. पुजाराला सराव करताना दिसला आणि त्यानंही सॉलिड फटकेबाजी केली.