20व्या षटकात रवींद्र जडेजानं पहिल्या चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेनं षटकार खेचला. त्यानंतर यॉर्कर चेंडूवर पुन्हा त्याच दिशेनं षटकार खेचला. हर्षलनं तिसरा चेंडू फुलटॉस फेकला आणि जडेजानं त्यालाही सीमापार टोलवले. पंचांनी तो नो बॉल दिला अन् फ्री हिटवरही जडेजान डीप मिडविकेटवर षटकार खेचला. त्यानंतर पुढील तीन चेंडूंवर २, ६ व ४ अशा धावा आल्या. जडेजानं या षटकांत ३६ धावा चोपल्या, तर एक नो बॉलमुळे आयपीएलमधील हे सर्वात महागडे ( ३७ धावा) षटक ठरले. जडेजानं २८ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६२ धावा चोपल्या.
चेन्नई सुपर किंग्सच्या ४ बाद १९१ धावांच्या प्रत्युत्तरात RCBला ९ बाद १२२ धावा करता आल्या अन् CSKनं ६९ धावांनी दणदणीत विजय साजरा केला.
जडेजानं या सामन्यात हर्षल पटेलच्या एका षटकात ५ षटकार खेचण्याचा पराक्रम केला. यापूर्वी ख्रिस गेल व राहुल टेवाटिया यांनी ही कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये एकाच षटकात सर्वाधिक ३६ धावा चोपणारा तो तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी ख्रिस गेल, सुरेश रैना यांनी ही कामगिरी केली आहे.
आयपीएलच्या एकाच सामन्यात ६०+धावा अन् ३ विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा तिसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी पॉल वॅल्थॅटी ( वि. डेक्कन चार्जर्स), युवराज सिंग ( दिल्ली कॅपिटल्स), युवराज सिंग ( राजस्थान रॉयल्स) यांनी ही कामगरी केली होती.
आयपीएलमध्ये सर्वात महागडे षटक टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये हर्षल पटेलनं नोंद केली. २०११मध्ये केरळ संघाच्या परमेश्वरननं RCBविरुद्ध ३७ धावा दिल्या होत्या. आज हर्षलनं त्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली.
हर्षल पटेलनं २०व्या षटकात ३७ धावा दिल्या. आयपीएलमधील हे सर्वात महागडे २०वे षटक ठरले. याआधी २०२०मध्ये ख्रिस जॉर्नडनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३० ( मार्कस स्टॉयनिस) धावा दिल्या होत्या. त्याच पर्वात लुंगी एनगिडीनं राजस्थान रॉयल्सविरुद्ध ३० व २०१७मध्ये अशोक दिंडानं मुंबई इंडियन्सविरुद्ध ३० धावा दिल्या होत्या.
आयपीएलमध्ये सर्वाधिक २३ डावांच २००+च्या स्टाईक रेटनं फटकेबाजी करणारा जडेजा हा पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी किरॉन पोलार्ड, एबी डिव्हिलियर्स, हार्दिक पांड्या व महेंद्रसिंग धोनी यांनी अशी कामगिरी केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध सर्वाधिक २३ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा मानही रवींद्र जडेजानं पटकावला. आशिष नेहरा, संदीप शर्मा व हरभजन सिंग यांनीही प्रत्येकी २३ विकेट्स घेतल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्सकडून एकाच सामन्यात ५०+ धावा व ३+ विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. आतापर्यंत १३ वेळा आयपीएलमध्ये खेळाडूंकडून अशी कामगिरी झाली आहे.