विराट कोहली आयपीएलच्या पुढील सीझनपासून आरसीबीचं नेतृत्त्व करणार नाहीय. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला आता नवा कर्णधार निवडावा लागणार आहे. यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन यानं मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
विराट कोहलीनंतर आरसीबीचं नेतृत्त्व कुणाकडे द्यावं याबाबत डेल स्टेन यानं भारतीय फलंदाजाचं नाव सुचवलं आहे.
कोहलीनंतर संघाचं नेतृत्त्व संघातीलच एखाद्या खेळाडूकडे किंवा एबीडी व्हिलियर्सकडे दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. पण डिव्हिलियर्स पुढचं सीझन खेळणार का? याबाबतही साशंकता आहे. यातच डेल स्टेन यानं सर्वांना आश्चर्यचकीत करणारं विधान केलं आहे.
पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल पुढच्या सीझनसाठीच्या लिलावात उपलब्ध असेल आणि आरसीबी केएल राहुल याला संघात दाखल करुन घेण्यासाठी उत्सुक असेल. आरसीबीचा संघ केएल राहुल याला खरेदी करुन संघाचं नेतृत्त्व त्याच्याकडे देईल, अशी प्रतिक्रिया डेल स्टेन यानं दिली आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत डेल स्टेन यानं हे विधान केलं आहे. 'आरसीबीला जर लाँग टर्मसाठी संघाचा कर्णधार हवा असेल तर त्यांनी भारतीय खेळाडूचीच निवड करायला हवी. केएल राहुल याआधी आरसीबीसाठी खेळलेला आहे आणि तोच उत्तम पर्याय ठरू शकेल', असं स्टेन म्हणाला.
'एबी डिव्हिलियर्सला संघाचा कर्णधार करणं योग्य ठरेल असं मला वाटत नाही. तो नक्कीच एक जबरदस्त खेळाडू आहे. पण आता करिअरच्या उत्तरार्धात आहे. त्यामुळे लाँग टर्मसाठी विचार करायचा झाल्यास आरसीबीसाठी केएल राहुल हेच नाव सुयोग्य ठरेल', असं डेल स्टेन म्हणाला.
केएल राहुल सध्या पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार असून कर्णधार म्हणून त्याची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्यामुळे पंजाबचा संघ केएल राहुलला करारमुक्त करण्याची शक्यता देखील कमी आहे.
तरीही डेल स्टेन याच्या मतानुसार केएल राहुल पुढील लिलावामध्ये सहभागी होईल आणि आरसीबीच्या संघात त्याचं पुनरागमन होईल. केएल राहुल जर लिलावासाठी उपलब्ध झाला तर तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बोलीवर विकत घेतला जाऊ शकेल, अशीही शक्यता त्यानं वर्तवली आहे.