फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी पुन्हा एकदा CSKला चांगली सुरुवात करून दिली. फॅफनं काही अप्रतिम फटके मारले. राहुल टेवाटियाच्या गोलंदाजीवर फॅफ ( २५) बाद झाला. सुरेश रैनाला आज बढती मिळाली, परंतु त्यालाही ( ३) टेवाटियानं बाद केलं.
अर्धशतकानंतर ऋतुराजनं धावांचा वेग वाढवताना टेवाटियाला सलग दोन खणखणीत षटकार खेचले. पण, त्याच षटकात मोईन अलीला आणखी धावा चोपण्याची हाव महागात पडली. अली २१ धावांवर यष्टिचीत झाला.
पण, ऋतुराजची भूक काही शमली नाही, त्यानं फटकेबाजी सुरूच ठेवली.ऋतुराजनं ६० चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह नाबाद १०१ धावा चोपल्या, तर जडेजानं १५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३२ धावा कुटल्या. चेन्नईनं ४ बाद १८९ धावा केल्या.
१८वं षटक संपलं तेव्हा ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) ९३ धावांवर नाबाद होता. १२ चेंडूंत तो सहज ७ धावा करून शतक पूर्ण करेल असे वाटत होते. पण, रवींद्र जडेजा भलत्याच मूडमध्ये होता.
त्या १२पैकी १० चेंडू जडेजानं खेळून काढली आणि त्यानं १५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून नाबाद ३२ धावा केल्या. ९५ धावांवर असताना ऋतुराजला २०व्या षटकाची दोन चेंडू मिळाले. पण, त्यातही मुस्ताफिजूर रहमाननं पाचवा चेंडू बाऊन्सर फेकला.
पण, ऋतुराजनं अखेरचा चेंडू ९८ मीटर लांब भिरकावून शतकही पूर्ण केलं अन् मनातही धाकधुकही थांबवली. पण, याही पलिकडे तो जो सामन्यानंतर म्हणाला, त्यानं सर्वांची मनं जिंकली..
सुरुवातीला विकेट टिकवून खेळण्यावर भर होता, कारण जलदगती गोलंदाजांनी उत्तम मारा केला. १३-१४व्या षटकापर्यंत टीकून धावा करण्यात मी यशस्वी झालो, तर त्यानंतरच्या षटकात आक्रमक धावा करण्याचा निर्धार होता. मी मोठे फटके मारण्याचा विचार करत नव्हतो, फक्त आलेला चेंडू योग्यरितीनं खेळण्याचा प्रयत्न होता.
आम्ही १६०पर्यंत लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते, त्यानंतर १७० आणि त्यानंतर १८० का नाही असा विचार करून खेळलो आणि अखेरीस आम्ही १९० धावांचे लक्ष्य ठेवले. डाव्याबाजूची सीमारेषा जवळ होती आणि त्यामुळे अखेरचा चेंडू षटकार जाईल हे मी आधीच हेरले
सरतेशेवटी संघाच्या धावा महत्त्वाच्या. तुमचा संघ जिंकत नाही तोपर्यंत वैयक्तिक धावांना काहीच अर्थ राहत नाही. नॉन स्ट्राईक एंडला उभं राहुन जडेजाला धावा करताना पाहून अत्यंत आनंद होत होता, असे ऋतुराज म्हणाला.