मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटमधील खरा थरार अनुभवायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्सच्या २२० धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ २०२ धावांवर माघारी परतला. चेन्नईनं हा सामना १८ धावांनी जिंकून आयपीएल २०२१मधील विजयाची हॅटट्रिक साजरी केली.
या विजयासह चेन्नईनं गुणतालिकेत अव्वल स्थानही पटकावले. मागील तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडनं आज चांगली सुरुवात करून दिली. त्यानं फॅफ ड्यू प्लेसिससह पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली.
ऋतुराज ४२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर बाद झाला. मोईन अली १२ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २५ धावांवर बाद झाला. महेंद्रसिंग धोनीनं चौथ्या क्रमांकावर येताना १७ धावा केल्या. चेन्नईनं २० षटकांत ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला. फॅफ ६० चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह ९५ धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या KKRला दीपक चहर धक्के दिले. त्यानं ४ षटकांत २९ धावांवर ४ विकेट्स घेतल्या. आयपीएल २०२१त पहिलाच सामना खेळणाऱ्या लुंगी एनगिडीनं राहुल त्रिपाठीला बाद करून कोलकाताचा निम्मा संघ ३१ धावांत माघारी परतला होता.
दिनेश कार्तिक व आंद्रे रसेल ही जोडी CSKच्या गोलंदाजांना भिडली. रसेलनं २२ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ५४ धावा केल्या. दिनेश कार्तिक २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावांवर माघारी फिरला.
पण, पॅट कमिन्सनं अनपेक्षित फटकेबाजी करून KKRची झुंज कायम राखली. पॅट कमिन्स ३४ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. कोलकाताचा संपूर्ण संघ २०२ धावांवर माघारी परतला.