रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला गुरुवारी मुंबई इंडियन्सकडून 6 धावांनी पराभव पत्करावा लागला. पण, या सामन्यात बंगळुरूच्या कर्णधार विराट कोहली याने विक्रमांची रांग लावली.
विजयासाठीच्या 188 धावांचा पाठलाग करताना कोहलीने 32 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 46 धावा केल्या.
या खेळीत त्याने आयपीएलमध्ये 5000 धावांचा पल्ला पार केला आणि सुरेश रैनानंतर अशी कामगिरी करणार तो दुसरा फलंदाज ठरला.
रैनाने याच सत्रात 23 मार्चला बंगळुरूविरुद्ध 5000 धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान मिळवला होता.
परंतु, कोहलीनं 165 सामन्यांत 5000 धावा चोपल्या आणि आयपीएलमध्ये सर्वात जलद 5000 धावांचा विक्रम नावावर केला.
विशेष म्हणजे कोहलीनं या 5000 धावा एकाच संघाकडून म्हणजेच बंगळुरूकडून केल्या आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
कोहलीने या खेळीसह मुंबई इंडियन्सविरुद्ध 600 धावाही पूर्ण केल्या अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरला.