कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि पार्थिव पटेल यांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 205 धावा कुटल्या. पण कोलकाता नाइट रायडर्सने कोहलीला तणावात ठेवले होते. पवन नेगीने बंगळुरुच्या कर्णधाराचे टेंशन कमी केले, परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला योग्य साथ मिळाली नाही.
आंद्रे रसेलने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका पार पाडली. त्याच्या फतकेबाजीच्या जोरावर कोलकाताने 5 विकेट राखून सामना जिंकला. रसेलने 13 चेंडूंत 7 षटकार आणि 1 चौकार खेचून 48* धावा केल्या.
कोलकाताला अखेरच्या चार षटकांत 66 धावा हव्या होत्या आणि त्यांची भिस्त आंद्रे रसेलवर होती. 17 व्या षटकात कार्तिक बाद झाला आणि कोलकाताला 18 चेंडूत 53 धावा हव्या होत्या. नवदीप सैनीने कार्तिकला बाद केले.
पण रसेलने कोलकाताला आणखी एका विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली. 18 व्या षटकात कोलकाताने 23 धावा चोपल्या.रसेलने 19 व्या षटकातच कोलकाताचा विजय जवळपास निश्चित केला होता. टीम साउदीच्या त्या षटकात त्याने 29 धावा कुटल्या.