भारतीय खेळाडूंच्या 'जर्सी क्रमांका'मागची मजेशीर गोष्ट...

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या जर्सीवर आपल्याला नेहमी एक क्रमांक दिसतो आणि त्याच क्रमांकानं अनेकजण खेळाडूला ओळखतातही.

पण, हा क्रमांक खेळाडूंना कोण देतो आणि कोणत्या खेळाडूला कोणता क्रमांक असावा, याचा निर्णय कोण घेतो? हे तुम्हाला माहीत आहे का?

या क्रमांकांमागेही एक मजेशीर गोष्ट आहे आणि कदाचीत ती तुम्हाला माहीत नसेल. प्रत्येक खेळाडू स्वतःचा जर्सी क्रमांक निवडतो, परंतु त्या प्रत्येक क्रमांकामागे एक कारण आहे. चला तर आज आपण अशाच काही खेळाडूंच्या क्रमांकाबद्दल जाणून घेऊया..

विराट कोहली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या जर्सीचा क्रमांक 18 आहे. याच क्रमांकाची जर्सी घालून विराटनं 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे तेव्हापासून तो याच क्रमांकाची जर्सी घालतो.

महेंद्रसिंग धोनी - भारतीय संघाचा माजी कर्णधार 7 क्रमांकाची जर्सी घालतो. त्यामागचं पहिलं कारण की धोनीचा वाढदिवस 7 जुलैला असतो. दुसरं कारण असं की त्याला फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आवडतो आणि रोनाल्डो 7 क्रमांकाची जर्सी घालतो.

सचिन तेंडुलकर - महान फलंदाज सचिन तेंडुलकर 10 क्रमांकाची जर्सी परिधान करायचा. यामागचं कारण त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. तो म्हणाला होता की, माझ्या नावात टेन येतं आणि त्यामुळेच मी 10 क्रमांकाची जर्सी घालतो. तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर शार्दूल ठाकूरनं 10 क्रमांकाची जर्सी घातली आणि त्यावर चाहते प्रचंड नाराज झालेय त्यामुळे शार्दूलला जर्सी क्रमांक बदलावा लागला.

युवराज सिंह - भारताच्या 2007 ( ट्वेंटी-20) आणि 2011 ( वन डे ) च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील नायक युवराज सिंग 12 क्रमांकाची जर्सी घालत होता. त्याचा जन्मदिवस 12 डिसेंबर 1981 मध्ये बरोबर 12 वाजता चंदीगढच्या सेक्टर 12मध्ये झाला होता. त्यामुळे 12 क्रमांक हा त्याच्यासाठी लकी मानला जातो.