आर अश्विन की अक्षर पटेल? वर्ल्ड कप संघ बदलण्याची आज डेड लाईन! रोहित शर्माचे स्पष्ट संकेत

ICC World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच आशिया चषक जिंकला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. आता भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. पण, एक पेच टीम इंडियासमोर आहे.

आशिया चषक स्पर्धेदरम्यान अक्षर पटेलला दुखापत झाली आणि त्याला फायनल व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली. अक्षरची वन डे वर्ल्ड कप संघात निवड झाली आहे. अशा परिस्थितीत तो आयसीसी स्पर्धेसाठी तंदुरुस्त आहे का, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

अक्षर पटेलची रिप्लेसमेंट म्हणून आशिया चषक स्पर्धेत वॉशिंग्टन सुंदरला बोलावले गेले, त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आर अश्विनची अचानक एन्ट्री झाली. त्यामुळे जर अक्षर तंदुरुस्त नसेल तर यापैकी एकाची निवड केली जाईल. भारताचा पहिला सराव सामना ३० सप्टेंबरला इंग्लंडशी होणार आहे.

अक्षर पटेल हा आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उत्तम पर्याय आहे. मात्र, त्याच्या गोलंदाजीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण संघातील अन्य दोन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हेदेखील डावखुरे गोलंदाज आहेत. अनेक विरोधी संघांमध्ये डावखुरे फलंदाज आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत ऑफ स्पिनर संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

अश्विनने मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ तर इंदूरमध्ये ३ बळी घेतले होते. दुसरा ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने शेवटच्या सामन्यात १० षटकात केवळ ४८ धावा दिल्या आणि ओपनिंगला येऊन १८ धावा केल्या. रोहित शर्मासह त्याने काल सलामीला ७० धावा जोडल्या. तिसरा फिरकीपटू म्हणून अक्षर, सुंदर आणि अश्विन हे त्यांच्या चांगल्या फलंदाजीमुळे शर्यतीत आहेत. शार्दूल ठाकूरलाही चांगल्या फलंदाजीचा फायदा झाला.

सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात अर्धशतके झळकावली. भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपदरम्यान बहुतांश सामने सपाट खेळपट्ट्यांवर होताना दिसतील. अशा स्थितीत सूर्य हा X फॅक्टर सिद्ध होऊ शकतो. जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी विश्वचषकापूर्वी आपल्या कामगिरीने सर्वांना उत्तर दिले आहे. अशा परिस्थितीत त्याच्या फिटनेसबाबत कोणताही प्रश्न उरला नाही.

"जेव्हा आम्ही १५ बद्दल बोलतो तेव्हा आम्हाला काय हवे आहे हे अगदी स्पष्ट असते. आम्ही गोंधळलेलो नाही, आम्हाला माहित आहे की आम्ही एक संघ म्हणून कोठे जात आहोत. हा एक सांघिक खेळ आहे आणि प्रत्येकाने त्यांची भूमिका बजावावी अशी आमची इच्छा आहे. अशा प्रकारे आम्ही चॅम्पियनशिप जिंकू. पुढील दीड महिना ताजे राहण्याचा प्रयत्न करा," असे रोहित म्हणाला.

भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.