KBC 15: लग्न कोणत्या मुलासोबत करणार? स्मृती मानधनाची अमिताभ बच्चन यांच्यासमोर 'मन की बात'

smriti mandhana kbc : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी स्मृती सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना तिच्या फलंदाजीच्या शैलीसह सौंदर्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी स्मृती सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे.

अलीकडेच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यात तिनं अप्रतिम कामगिरी केली. इंस्टाग्रामवर तिचे ८५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

स्मृती मानधना आता 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातील तिच्या एका टिप्पणीमुळे चर्चेत आली आहे. अमिताभ बच्चन यांच्यासमोर स्मृतीनं वैयक्तिक जीवनाबद्दल भाष्य केलं असून आयुष्याचा जोडीदार कसा यावर आपलं मत मांडलं आहे.

'उपलब्धियों का वर्ष' या कार्यक्रमात स्मृती मानधना आणि भारतीय पुरूष संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सहभागी झाले होते. यावेळी चाहत्यांसह बिग बी यांनी दोन्ही स्टार खेळाडूंना विविध प्रश्न विचारून कोड्यात पकडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमधील एका तरुणाने स्मृती मानधनाला एक भन्नाट प्रश्न केला. "सोशल मीडियावर तुझे खूप फॉलोअर्स आहेत. भारतातील अनेक तरूण मुलं तुला फॉलो करतात. त्यामुळे तुला माझा प्रश्न आहे की तुला मुलांमध्ये कोणते गुण आवडतात?", हा प्रश्न ऐकताच अमिताभ बच्चन यांना हशा पिकला.

चाहत्याच्या प्रश्नावर 'तुझं लग्न झालं आहे का?' अशी विचारणा अमिताभ यांनी केली. यावर मुलानं सांगितलं की, लग्न झालं नाही म्हणूनच हा प्रश्न विचारला आहे.

चाहत्याच्या प्रश्नावर व्यक्त होताना स्मृतीनं म्हटलं, "मी अशा प्रश्नाची अपेक्षा केली नव्हती. पण होय, मुलगा चांगला असावा, ही एक महत्त्वाची बाब आहे." यावर अमिताभ म्हणाले की, चांगला म्हणजे कसा, तो कसा असतो?

अमिताभ यांनी फिरकी घेतल्यानंतर स्मृती म्हणाली, "मला वाटतं की काळजी करणारा असावा आणि माझ्या खेळाला समजून घ्यायला हवं. या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मला त्याच्याकडे पाहिजे आहेत. कारण एक मुलगी म्हणून मी त्याला जास्त वेळ देऊ शकणार नाही, म्हणून त्यानं या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि नेहमी काळजी घ्यायला हवी."

"या दोन गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत, ज्या मी मुलामध्ये पाहते", असेही स्मृतीनं सांगितलं. यावर अमिताभ बच्चन म्हणाले, "एकूणच तुला सांगायचं आहे की, त्यानं तुझा आदर आणि सन्मान केला पाहिजे."

स्मृती मानधनाने आतापर्यंत ६ कसोटी, ८० वन डे आणि १२५ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये तिनं अनुक्रमे ४८०, ३१७९ आणि २९९८ धावा केल्या आहेत. तिच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक आणि वन डेमध्ये पाच शतकांची नोंद आहे.