ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या WTC फायनलपूर्वी टीम इंडियाला 'दुखापतीचं ग्रहण', ४ खेळाडूंच्या खेळण्यावरून संभ्रम

IPL 2023 Injury List : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आयपीएलची स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडच्या धरतीवर ऑस्ट्रेलियाविरूद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. काही अनुभवी खेळाडूंचे या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

मागील आठवड्यात या सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली आहे. पण मागील काही दिवसांपासून आयपीएलमध्ये खेळाडूंना होत असलेली दुखापत चिंतेचा विषय ठरत आहे.

भारताचा स्टार खेळाडू लोकेश राहुल दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. तो ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाचा हिस्सा आहे.

आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार असलेल्या लोकेश राहुलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली. त्याची दुखापत पाहता तो आगामी काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. हाताच्या दुखापतीमुळे राहुल WTC फायनलमध्ये खेळणार का हे पाहण्याजोगे असेल.

राहुलचा सहकारी जयदेव उनाडकट दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. सराव सत्रात दुखापत झाल्यामुळे उनाडकटला आयपीएलला मुकावे लागले. त्यामुळे आगामी अंतिम सामन्यात त्याच्या खेळण्यावर संभ्रम आहे.

2023 च्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेचा भाग नसतानाही शार्दुल ठाकूरची WTC अंतिम सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. पण तो देखील आताच्या घडीला दुखापतीचा सामना करत आहे. त्याच्या फिटनेसवरून प्रश्न उपस्थित केले जात आहे.

शार्दुल ठाकूरचा सहकारी उमेश यादव देखील दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे यादवच्या दुखापतीने देखील बीसीसीआयची डोकेदुखी वाढवल्याचे दिसते.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अंतिम सामन्यासाठी रिषभ पंतच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षणाची धुरा पुन्हा एकदा के.एस. भरतकडे सोपवण्यात आली आहे, तर रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल अशा तीन फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

WTC फायनलसाठी भारतीय संघ - - Marathi News | wtc final squad | Latest cricket Photos at Lokmat.com

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.