Virat Kohli Ravi Shastri, IPL 2022 RCB vs GT: भारतीय क्रिकेट संघाचा आणि RCBचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. आतापर्यंत १३ सामन्यांमध्ये त्याने केवळ एकच अर्धशतक ठोकलं आहे.
विराटच्या फलंदाजीचा विचार केला तर त्याने यंदाच्या हंगामात १९.६७ च्या सरासरीने अतिशय सुमार कामगिरी केली आहे. त्याने ११३ च्या स्ट्राईक रेटने २३६ धावा केल्या आहेत.
विराटच्या फॉर्मची केवळ RCB नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रिकेटप्रेमींना चिंता लागून राहिली आहे. याच दरम्यान भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
RCBचा यंदाच्या हंगामातील शेवटचा साखळी सामना आज 'टेबल टॉपर' गुजरातशी आहे. या सामन्यात विराट कोहलीने चांगला खेळ करावा यासाठी रवी शास्त्रींनी त्याला कानमंत्र दिला आहे.
'जर विराट कोहलीला सलामीला फलंदाजी करायची असेल तर त्याने निर्भिडपणे फलंदाजी करायला हवी. कोहली सध्या खूप प्रयत्न करतोय पण नशीब त्याच्या बाजूने नाही. त्यामुळे त्याने अधिक परिश्रम घेण्याशिवाय पर्याय नाही', असे शास्त्री म्हणाले.
'प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यामुळे कोहलीने योग्य चेंडूची वाट बघून आपली खेळी खेळली पाहिजे. खराब फॉर्ममुळे निराश होण्याचं काहीच कारण नाही. त्याऊलट त्याने हा विचार करायला हवा की तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. या सकारात्मकतेने खेळल्यास तो नक्कीच यशस्वी होईल', असेही शास्त्री म्हणाले.