कुलदीपची पुन्हा एकदा बागेश्वर धामला 'भेट', फिरकीपटूनं कुटुंबीयांसह धीरेंद्र शास्त्रींचे घेतले आशीर्वाद

आशिया चषकात चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ वन डे विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे.

आशिया चषकात चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ वन डे विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. भारताला 'आशियाई किंग्ज' बनवण्यात फिरकीपटू कुलदीप यादवने मोलाची भूमिका बजावली.

आशिया चषकापूर्वी बागेश्वर धामला भेट देणाऱ्या कुलदीप यादवने पुन्हा एकदा या धार्मिक स्थळाला भेट दिली. कुलदीपने आशिया चषकातील दोन सामन्यांमध्ये नऊ बळी घेतले आहेत.

आशिया चषकातील भरघोस यशानंतर पुन्हा एकदा चायनामॅन कुटुंबीयांसह बागेश्वर धामला गेला. त्याने धीरेंद्र शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

"चायनामॅन म्हणून ओळखला जाणारा जगप्रसिद्ध भारतीय फिरकीपटू आणि सरकारचे आवडते शिष्य कुलदीप यादव याने सरकारला भेट देण्यासाठी बागेश्वर धाम गाठले. आशिया चषकात मालिकावीराचा किताब पटकावल्यानंतर सरकारचे आशीर्वाद घेण्यासाठी त्याने हजेरी लावली. आगामी विश्वचषकात चांगली कामगिरी करावी यासाठी त्याने आशीर्वाद घेतले", अशा आशयाचे कॅप्शन देण्यात आले आहे.

लक्षणीय बाब म्हणजे आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होण्याआधी देखील कुलदीप यादवने बागेश्वर धामला भेट दिली होती. खरं तर जुलैमध्ये देखील कुलदीप आशीर्वाद घेण्यासाठी बागेश्वर धामला पोहोचला होता.

आशिया चषकाच्या सुपर ४ मध्ये पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात कुलदीपने ५ बळी घेतले होते. कुलदीपच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना २२८ धावांनी आपल्या नावावर केला.

पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर कुलदीप यादवने यजमान श्रीलंकेविरूद्ध देखील कमाल केली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४ बळी घेऊन कुलदीपने भारताला विजय मिळवून दिला. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात त्याला जास्त गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही कारण श्रीलंकेचा संघ केवळ ५० धावांवर सर्वबाद झाला.

अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने सहा बळी घेऊन श्रीलंकेला मोठे धक्के दिले अन् भारताने आठव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले.

आता कुलदीप यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळताना दिसणार आहे. मात्र, पहिल्या दोन वन डे सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे विश्वचषकात खेळताना तो दिसणार आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.