'हिटमॅन'च्या बर्थडे पार्टीला मुंबईच्या शिलेदारांची हजेरी; आकाश अंबानींसह भज्जीचीही उपस्थिती

Rohit Sharma Birthday : रोहितच्या वाढदिवशीच मुंबईचा संघ आयपीएलच्या इतिहासातील १००० वा सामना खेळत आहे.

आज मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा ३६ वाढदिवस असून हिटमॅनने आपला वाढदिवस मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांसोबत साजरा केला. रोहितच्या वाढदिवशीच मुंबईचा संघ आयपीएलच्या इतिहासातील १००० वा सामना खेळत आहे.

आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे. रोहितने आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एक पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये मुंबईच्या खेळाडूंनी हजेरी लावली.

रोहित पत्नी रितीका सजदेहसोबत पार्टीला पोहचला. रोहित शर्माने मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाची पार्टी केली.

रोहितच्या पार्टीत संघाच्या कोचिंग स्टाफपासून ते संघातील सर्व खेळाडू पोहोचले. बर्थडे पार्टीत संघाचे मालक आकाश अंबानीही उपस्थित होते.

आयपीएलच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेला हरभजन सिंगही या पार्टीत दिसला. त्याने काळ्या रंगाचा ओव्हरसाईज टी-शर्ट घातला होता.

रोहित शर्माचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी नागपूर येथे झाला. त्याची आई विशाखापट्टणमची आहे. वडील डोंबिवलीत एका छोट्याशा खोलीत राहत असल्याने रोहित शर्मा आजोबा आणि काकांसोबत राहत होता.

खरं तर रोहित बालपणी फक्त आठवड्याच्या शेवटी अर्थात वीकेंडला आई-वडिलांना भेटायला जायचा. त्याच्या काकांनी त्याला क्रिकेट अकादमीत पाठवायला मदत केली.

रोहित शर्माने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने २००७ मध्ये वन डे आणि ट्वेंटी-२० आणि सहा वर्षांनंतर २०१३ मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले.

रोहित शर्मा सध्या भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याने ४९ कसोटी, २४३ वन डे आणि १४८ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. यासोबतच रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदही सांभाळत असून तो आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा कर्णधार ठरला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाचवेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. यंदाच्या हंगामात मुंबईची वाटचाल चढ-उताराची राहिली असून संघाला तीन सामने जिंकण्यात यश आले आहे.