IND vs BAN 2nd Test, Team India: "हो, आम्ही चुका केल्या पण..."; रडतखडत मिळालेल्या विजयानंतर भारतीय कर्णधार KL Rahul ची प्रामाणिक कबुली

टीम इंडियाने २-० ने जिंकली बांगलादेश विरूद्धची कसोटी मालिका

KL Rahul Team India, IND vs BAN 2nd Test: भारतीय संघाने बांगलादेश विरूद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. पहिला सामना भारताने जिंकलाच होता. दुसऱ्या सामन्यात शेवटच्या डावात भारताला १४५ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताची अवस्था ७ बाद ७४ झाली होती. पण आर अश्विन आणि श्रेयस अय्यर जोडीने ७१ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला सामना जिंकवून दिला.

वन डे मालिकेत अनपेक्षित २-१ असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीम इंडियाने हिशेब चुकता केला. आर अश्विनने दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करून दाखवली. त्याने पहिल्या डावात ४ बळी टिपले तर दुसऱ्या डावात २ बळी टिपले. त्यासोबतच भारतीय फलंदाजीची घरसगुंडी झाल्यानंतर त्याने नाबाद ४२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

भारताच्या या रडतखडत झालेल्या विजयानंतर कर्णधार केएल राहुलने त्याची भूमिका मांडली. तो म्हणाला, "तुम्हाला तुमच्या संघावर विश्वास ठेवावाच लागतो. जे खेळाडू त्या वेळी मैदानात खेळत असतात त्यांना तुमचा पाठिंबा हवा असतो. आमच्या खेळाडूंवर आमचा कायमच विश्वास असतो. पण जेव्हा तणावाची परिस्थिती येते, तेव्हा कोणता खेळाडू किंवा संघ जास्त समतोल आहे ते समजतं. अखेर आम्हीही माणूसच आहोत त्यामुळे काही गोष्टी चुकू शकतात."

"आमच्या गोलंदाजांबद्दल माझी काहीच तक्रार नाही. गेल्या ६-७ वर्षात आमच्या संघाची गोलंदाजी खूपच चांगली होऊ लागली आहे. वेगवान गोलंदाजी हळूहळू बहरताना दिसतेय. अश्विन-अक्षर जोडी खूपच छान कामगिरी करतेय. उमेश यादव आणि जयदेव उनाडकट दोघेही चांगली लय दाखवत आहे. त्यामुळे सध्याचा संघ खूपच चांगला आहे," असेही राहुलने सांगितले.

पुढे तो म्हणाला, "आम्ही आमच्या फलंदाजांवर आज पूर्ण विश्वास ठेवला होता. अश्विन आणि श्रेयस दोघांनी तो विश्वास सार्थ ठरवला. त्यांनी अतिशय सहजतेने विजय मिळवून दिला. भारतासाठी असा विजय मिळणं खूपच चांगली गोष्ट आहे. कारण सामना जा स्थितीत येईल असा आम्ही विचारही केला नव्हता, पण तितकी कठीण परिस्थिती आली असताना आमच्या खेळाडूंनी योग्य फटके मारले नी विजय मिळवला ही बाब महत्त्वाची आहे."

"नव्या चेंडूवर खेळणं काहीसं कठीण होतं. आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त विकेट्स सुरूवातीलाच गमावून बसलो. आमच्याकडून नक्कीच चुका झाल्या. पण या चुकांमधून आम्ही धडा घेऊ आणि मला अपेक्षा आहे की पुन्हा कधी अशी परिस्थिती सामन्यात उद्भवली तर यापेक्षा आणखी सहजतेने आम्ही सामना जिंकू," असा विश्वास केएल राहुलने व्यक्त केला.