भारत शेजाऱ्यांवर डबल 'स्ट्राईक' करण्याच्या तयारीत; ICC ने सांगितला पाकिस्तानविरुद्धचा प्लान

भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ च्या सामन्यात पाकिस्तानचे वस्त्रहरण केले... जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची फौज असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय फलंदाजांनी तारे दाखवले. आता आणखी एक धक्का देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.

विराट कोहली व लोकेश राहुल यांनी वैयक्तिक शतकं झळकावताना ३५७ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कुलदीप यादवने फिरकीवर नंबर १ फलंदाज बाबर आजमसह सर्वांना नाचवले. कुलदीपने ५ विकेट्स घेत पाकिस्तानला २२८ धावांनी हार मानण्यास भाग पाडले.

भारताविरुद्धच्या या पराभवाने पाकिस्तानचा आशिया चषक फायनलमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. त्यांना उद्या श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवावाच लागेल, पण जर पावसामुळे सामना रद्द झाला तर त्यांचे पॅकअप निश्चित आहे. आता भारतीय संघ बाबर आजम अँड टीमला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत.

भारताविरुद्ध पराभव अन् दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय... यामुळे पाकिस्तानला आयसीसी वन डे क्रमवारीत नंबर १ स्थानावरून हात गमवावे लागले. पण, काल तिसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाची हार झाली अन् पाकिस्तान पुन्हा दुसऱ्या क्रमांवरून वर सरकला.

पाकिस्तानला हे स्थान टिकवणे आता अवघड आहे, कारण भारतीय संघ या शर्यतीत उतरला आहे. आशिया चषक स्पर्धेतील कामगिरी पाहता भारतीय संघ नंबर १च्या शर्यतीत कडवी टक्कर देणार हे निश्चित आहे.

पाकिस्तान सध्या ११८ रेटींग पाँइंटसह अव्वल स्थानावर आहे. त्यांना उद्या श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे आणि हा सामना जिंकल्यास ते १७ सप्टेंबरला फायनल खेळतील. त्यांनी या दोन्ही लढती जिंकल्या, तर ते अव्वल स्थानावर कायम राहतील.

ऑस्ट्रेलियाचेही समान ११८ रेटींग पाँइंट्स आहेत आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ( १५ व १७ सप्टेंबर) आणि भारताविरुद्ध ( २२, २४ व २७ सप्टेंबर) वन डे सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियाने हे सर्व सामने जिंकल्यास ते नंबर १ बनतील.

भारतीय संघालाही नंबर १ होण्याची संधी आहे. ११६ रेटींग पाँइंटसह ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना बांगलादेशविरुद्ध ( १५ सप्टेंबर), आशिया चषक फायनल ( १७ सप्टेंबर) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ( २२, २४ व २७ सप्टेंबर) तीन वन डे सामने खेळायचे आहेत. हे सर्व सामने जिंकून नंबर १ बनण्याची संधी आहे.