India vs Pakistan : IPLनंतर भारतीय संघ सुसाट सुटणार, वर्ल्ड कपआधी १८ ट्वेंटी-२० सामने खेळणार; पाकिस्तानला दोनवेळा टक्कर देणार

India cricket Team Schedule for Year 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला २६ मार्चपासून सुरूवात होणार आहे आणि २९ मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. यानंतर भारतीय खेळाडू पुन्हा एकदा राष्ट्रीय कर्तव्यावर परतणार आहेत.

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला २६ मार्चपासून सुरूवात होणार आहे आणि २९ मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. यानंतर भारतीय खेळाडू पुन्हा एकदा राष्ट्रीय कर्तव्यावर परतणार आहेत. यंदाचे वर्ष हे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे आहे आणि रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात इतिहास घडवणार असा सर्वांना विश्वास आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची दमछाक होणार आहे. यंदाच्या वर्षाय भारत-पाकिस्तान दोन वेळा एकमेकांना भिडणार आहेत. त्यासह इंग्लंड दौऱ्यावर ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्याची टीम इंडियाला संधी आहे. आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंचं आंतरराष्ट्रीय वेळापत्रक व्यग्र आहे.

आयपीएल २०२२नंतर भारतीय संघ पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयर्लंड दौऱ्यावर दोन ट्वेंटी-२० ( २६ व २८ जून) साने खेळणार आहे. तिथून इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी, तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे.

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तेच ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच्याही तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत.

चार वर्षांनंतर श्रीलंकेत आशिया चषक खेळवण्यात येणार आहे आणि यंदा ही स्पर्धा ट्वेंटी-२० स्वरुपात असणार आहे. सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे आणि यात भारत-पाकिस्तान यांच्यात दोन सामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत भारतीय संघ पाच सामने खेळणार आहे.

२३ ऑक्टोबरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल. भारत आणि पाकिस्तान हे सुपर १२मध्ये एकाच गटात आहेत. यांच्यासह दक्षिण आफ्रिका, बांगलादेश व दोन क्वालिफायर संघही ग्रुप २ मध्ये आहेत.

वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यावर चार कसोटी व तीन ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. २०१७नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिका खेळणार आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बांगलादेश व श्रीलंका यांच्याविरुद्धही मालिका होणार आहेत. बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी व तीन वन डे, तर श्रीलंकेविरुद्ध पाच वन डे सामन्यांची मालिका होईल.