India vs England Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू झाला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात शार्दूल ठाकूर याच्याजागी इशांत शर्मा याची अंतिम अकरामध्ये निवड झाली आहे. इंग्लंडच्या संघात हसीब हमीद, मोईन अली आणि मार्क वूड हे तीन नवीन चेहरे दिसत आहेत. पण, एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
भारतीय वंशाच्या महिलेला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. तिला डेल्टा या नावानं चिवडले गेले अन् इतकी वर्ष ब्रिटनमध्ये राहूनही तिला भारतात परत जाण्यास सांगितले गेले. इतकेच नव्हे तर विराट कोहली व मोहम्मद शमी यांच्यावरही अभद्र भाषेत टीका केली गेली, हे सर्व पहिल्या कसोटीत घडले. त्या महिलेनं सोशल मीडियावर तिला आलेला हा भयानक अनुभव शेअर केला...
तिनं लिहिले की, ''मी ३१ वर्षांची ब्रिटिश इंडियन महिला आहे. मी इंग्लंडमध्येच जन्मली आणि लहानाची मोठी झाली. मी ब्रिटिश नागरिक आहे हे मी अभिमानाने सांगते. माझे वंशज भारतीय होते आणि त्यामुळे मला दोन्ही देशांची ओळख मिळाली आहे. मी ब्रिटिश सोसायटीतील सक्रीय सदस्य आहे. मला कधीच वर्णद्वेषाचा किंवा शिक्षणात भेदभावाचा सामना करावा लागला नाही. माझे अनेक इंग्लिश मित्र आहेत आणि त्यांनी कधीच माझ्या वंशाची खिल्ली उडवली नाही, उलट त्यांना भारतीय संस्कृती फार आवडते.''
''मी प्रत्येक क्रिकेट सामना पाहायला जाते आणि टीम इंडियाची जर्सी घालून त्यांना चिअर करते. इंग्लंड विरुद्ध भारत या कसोटी सामन्यात दोन्ही संघाचा मोठा चाहता वर्ग असतोच, परंतु त्यांच्यात सौहार्दपूर्ण व आदरभावना असते,''असे तिने सांगितले.
ती पुढे म्हणाली,''पण मी आता नॉटिंगहॅम येथून लंडन असा ट्रेननं प्रवास करत आहे आणि मी रडतेय. माझे कुटुंब आणि मी नेहमीच क्रिकेटचे फॅन आहोत. आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडूला त्याच्या चांगल्या कामगिरीची टाळ्या वाजवून दाद देतो. पण, भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही स्टँडवर जेथे बसलो होतो तेथे इंग्लंडचे चाहते आमच्या मागे बसले होते आणि ते भारतीय खेळाडूंना डिवचत होते. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.''
''इंग्लंडचे चाहते मद्यधुंद अवस्थेत होते आणि ते सातत्यानं भारतीय खेळाडूंचा अपमान करत होते. शमी सीमारेषेवर फिल्डींग करताना “shitty Shami” असे उच्चारत होते, तर विराट कोहलीनं DRS गमावल्यानंतर त्याला “wanker Kohli”, “lazy Indian players, Indian cheaters” असे बरेच काही म्हणत होते. हे बराच काळ सुरू होते,''असे त्या महिलेनं लिहिलं.
''ते शिविगाळ करत होते. पण, त्यानंतर त्यांनी मर्यादा ओलांडली. तु कोणत्या देशाची आहेस? असे ते मला विचारले गेले. त्यांना मी आदरानं वागा असे सांगितले, तेव्हा त्यांनी मला भारतात जाण्यास सांगितले. त्यानंतर मी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितले अन् त्यांनी त्यांना बाहेर नेले,''असेही ती म्हणाली