India VS England: लॉर्ड्सवरील पराभव इंग्लंडच्या जिव्हारी, संघात मोठे बदल होणार; या दोन स्फोटक फलंदाजांना खेळवणार

India VS England Update: लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाने केलेल्या पराभवामुळे इंग्लंडच्या संघाला जबरदस्त हादरा बसला आहे. त्यामुळे मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून जोरदार पुनरागमन करण्यासाठी इंग्लिश संघ प्रयत्नशील आहे.

लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाने केलेल्या पराभवामुळे इंग्लंडच्या संघाला जबरदस्त हादरा बसला आहे. त्यामुळे मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून जोरदार पुनरागमन करण्यासाठी इंग्लिश संघ प्रयत्नशील आहे. त्यामुळेच कमकुवत फलंदाजीला मजबुती देण्यासाठी इंग्लिश संघामध्ये दोन विस्फोटक फलंदाजांचा समावेश करण्यात येणार आहे. तर लॉर्ड्स कसोटीत खेळलेला वेगवान गोलंदाज मार्क वुड हा दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार जेम्स विन्स आणि जगातील अव्वल टी-२० फलंदाज डेव्हिड मलान यांना इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले होते.

रोरी बर्न्स आणि डॉम सिब्ली यांनी इंग्लंडच्या संघाला निराश केले आहे. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये हे दोन्ही फलंदाज खातेही उघडू शकले नव्हते. आता तिसऱ्या कसोटीमध्ये त्यांच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.

३० वर्षांच्या जेम्स विन्स यानेही इंग्लंडसाठी १३ कसोटी सामन्यांमध्ये केवळ २४.९०च्या सरासरीने ५४८ धावा जमवल्या आहेत. मलान आणि विन्सला खराब कामगिरीनंतर कसोटी संघातून बाहेर करण्यात आले होते.

तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या संघासाठी अजून एक चिंताजनक बाब म्हणजे त्यांचा वेगवान गोलंदा मार्क वुड हा जखमी झाला आहे. त्यामुळे तो तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. तत्पूर्वी इंग्लंडचा अजून एक वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हासुद्धा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नव्हता.

भारत आणि इंग्लंड दरम्यान, तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून हेडिंग्लेमध्ये खेळवला जाणार आङे. तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा आज होऊ शकते.