Join us  

India vs England 3rd Test : चेंडूला थूंकी लावली, अम्पायरसोबत हुज्जत घातली; भारताला रोखण्यासाठी इंग्लंडनं अनेक रडीचे डाव खेळले!

By स्वदेश घाणेकर | Published: February 25, 2021 7:45 AM

Open in App
1 / 12

अक्षर पटेलनं ( Axar Patel) दिलेल्या दणक्यानंतर इंग्लंडच्या संघाला रोहित शर्मानं ( Rohit Sharma) चोपून काढलं. फिरकी गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर तीन जलदगती गोलंदाज खेळवण्याची चूक इंग्लंडला पहिल्याच दिवशी महागात पडल्याचे दिसले. अक्षर पटेल आणि आर अश्विन ( R Ashwin) यांनी इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गुंडाळला आणि प्रत्युत्तरात भारतानं पहिल्या दिवसअखेर ३ बाद ९९ धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाचा डाव सावरला.

2 / 12

नाणेफेकीचा कौल बाजूनं लागताच इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, भारतीय फिरकीपटूंनी त्याला हा निर्णय का घेतला, असा विचार करण्यास भाग पाडले. शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्मानं ( Ishant Sharma) इंग्लंडला तिसऱ्याच षटकात धक्का दिला.

3 / 12

कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) खेळपट्टीचा मूड पाहताच लगेच फिरकीपटूंना पाचारण केलं. त्याचा हा डाव यशस्वी ठरला. अक्षर पटेलनं ३८ धावांत ६ विकेट्स घेतल्या. आर अश्विननं २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली ( ५३) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले.

4 / 12

शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा झटपट माघारी परतल्यानंतर रोहितनं कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रोहितनं घरच्या मैदानावर ६००० आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या आणि असा पराक्रम करणारा तो ९वा भारतीय फलंदाज ठरला.

5 / 12

रोहितनं कसोटीत सलामीवीर म्हणून सहाव्यांदा ५०+ धावा केल्या. विराट कोहलीला जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर जीवदान मिळालं. पण, जॅक लिचनं त्याला २७ धावांवर माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. रोहित ५७ धावांवर, तर अजिंक्य रहाणे १ धावेवर खेळत आहे. भारत अजूनही १३ धावांनी पिछाडीवर आहे.

6 / 12

इंग्लंडच्या संघाकडून रडीचा डाव झालेला पाहायला मिळाला. बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) शुबमन गिलचा स्लीपमध्ये झेल टीपल्याची अपील केली. पण, तिसऱ्या पंचांनी गिलला नाबाद दिले आणि त्यानंतर कर्णधार जो रुट व स्टुअर्ट ब्रॉड यांनी मैदानावरील पंचांशी हुज्जत घातली.

7 / 12

स्टोक्सनं तो झेल सोडल्याचे स्पष्ट दिसत होते आणि त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि माजी सलामीवीर सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी स्टोक्सचा समाचार घेतला. नेटिझन्सनीही त्याला झोडपले. गावस्कर यांनी तर सामन्यानंतर भेट असा थेट इशाराच कॉमेंट्री करताना दिला.

8 / 12

तिसऱ्या पंचांनी गिलला नाबाद दिल्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडनं मैदानावरील अम्पायरकडे दाद मागितली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटही त्याच्यासोबत हुज्जत घालण्यासाठी आला.

9 / 12

कोरोना व्हायरसमुळे चेंडूवर थुंकी किंवा लाळ लावण्याची बंदी असतानाही बेन स्टोक्सला चेंडू चमकावण्यासाठी थुंकीचा वापर करताना पकडला गेला अन् अम्पायरनी त्याला वॉर्गिंगही दिली.

10 / 12

या सर्व गोंधळात एका फॅननं सुरक्षारक्षकांना चुकवून थेट मैदानावर धाव घेतली आणि विराट कोहलीला हात मिळवण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवानं विराटनं त्याला लांब ठेवले.

11 / 12

इंग्लंडचे गोलंदाज खेळपट्टीवर धावत असल्याची तक्रार रोहित शर्मानं अम्पायरकडे केली.

12 / 12

जॅक लिचच्या गोलंदाजीवर रोहित शर्माला यष्टिचीत केल्याची अपील इंग्लंडच्या खेळाडूंनी केली. पण, तिसऱ्या अम्पायरनं एकदाच रिप्ले पाहून तो नाबाद असल्याचा निर्णय दिला. या विरोधात जो रूटनं संताप व्यक्त केला. त्यान मैदानावरील अम्पायरकडे अजून रिप्ले पाहण्याची विनंती केली, पण त्याला दाद मिळाली नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबेन स्टोक्सस्टुअर्ट ब्रॉडरोहित शर्माअक्षर पटेलआर अश्विनअजिंक्य रहाणेविराट कोहली