Join us  

India vs Australia : टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी; जाणून घ्या कशी

By स्वदेश घाणेकर | Published: January 01, 2021 12:01 PM

Open in App
1 / 9

India vs Australia : भारतीय संघानं बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून सर्वांना आश्चर्यचकीत केलं. ०-१ अशा पिछाडीवरून टीम इंडियानं पुनरागमन करताना चार सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. आता ७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.

2 / 9

या मालिकेत टीम इंडियाला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं केलेलं कमबॅक पाहून अव्वल स्थानही शक्य होईल, असा विश्वास चाहत्यांना वाटत आहे.

3 / 9

भारतीय संघाला अॅडलेड कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांवर गडगडला होता आणि ऑस्ट्रेलियानं ती कसोटी ८ विकेट्स राखून जिंकली होती. पण, अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं जोरदार पुनरागमन केलं आणि मेलबर्न कसोटी ८ विकेट राखून जिंकली.

4 / 9

या विजयामुळे टीम इंडियाचे आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पक्कं करण्याच्या आशा बळावल्या आहेत. सध्या आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया ११४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या खात्यात प्रत्येकी ११६ गुण आहेत आणि ते अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.

5 / 9

अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियानं ही मालिका ३-१ अशा फरकानं जिंकल्यास ते कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावतील. भारतानं ३-१ अशी मालिका जिंकली, तर त्यांना अव्वल स्थानी विराजमान होण्यास कोणी अडवू शकत नाही.

6 / 9

पण, २-१ असा विजय मिळवला, तर त्यांना न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याच्या निकालाकडेही लक्ष ठेवावे लागेल. दुसऱ्या कसोटीत पाकिस्ताननं अनिर्णीत निकाल नोंदवला किंवा विजय मिळवल्यास, भारताचे अव्वल स्थान पक्के होईल. ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकल्यास, ते अव्वल स्थानी कायम राहतील.

7 / 9

भारतीय कर्णधार विराट कोहलीनेआयसीसी कसोटी फलंदाजांच्या मानांकनामध्ये दुसरे स्थान कायम राखले आहे, तर कार्यवाहक कर्णधार अजिंक्य रहाणेने पाच स्थानांची प्रगती करताना अव्वल १० मध्ये स्थान मिळविले आहे. रहाणेने मेलबोर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत ११२ व नाबाद २७ धावांची खेळी करीत भारताला ८ गडी राखून विजय मिळवून दिला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तो मानांकनामध्ये पाचव्या स्थानी पोहोचला होता.

8 / 9

ऑफ स्पिनर आर. अश्विनने दोन स्थानांची प्रगती करीत सातवे स्थान गाठले आहे तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नवव्या स्थानी पोहोचला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ५७ धावांच्या खेळीसह तीन बळी घेणारा रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी कायम आहे. तो जेसन होल्डरच्या तुलनेत सात मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. फलंदाजीमध्ये तो ३६ व्या तर गोलंदाजीमध्ये १४ व्या स्थानी पोहोचला आहे.

9 / 9

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला पिछाडीवर सोडत अव्वल स्थान गाठले आहे. स्मिथची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. पाकिस्तानच्या फवाद आलमने ८० स्थानांची प्रगती करताना १०२ वे स्थान गाठले आहे तर मोहम्मद रिजवान कारकिर्दीतील सर्वोत्तम ४७ व्या स्थानी आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआयसीसीन्यूझीलंडपाकिस्तान