रोहित शर्मा ( ३५) बाद झाल्यानंतर शुबमनने अनुभवी चेतेश्वर पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी २४८ चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. शुबमन २३५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२८ धावांवर बाद झाला. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या काही षटकांनंतर रवींद्र जडेजाने विकेट फेकली. जडेजा ८४ चेंडूंत २८ धावांवर माघारी परतला. कोहलीसोबत त्याने ६४ धावा जोडल्या होत्या.
विराट व केएस भारत यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. कॅमेरून ग्रीनच्या एका षटकात भरतने दोन षटकार व एक चौकारासह १९ धावा चोपल्या. या कसोटीतील हे सर्वात महागडे षटक ठरले. नॅथन लाएनने ही विकेट मिळवून दिली. भरत ८८ चेंडूंत ४४ धावांवर ( २ चौकार व ३ षटकार) माघारी परतला आणि विराटसह त्याची ८४ धावांची भागीदारी संपुष्टात आली.
दरम्यान, २२ नोव्हेंबर २०१९ नंतर विराट कोहलीने कसोटीत शतक पूर्ण केले. कसोटीतील हे त्याचे २८ वे शतक ठरले. त्याने शतकानंतर गळ्यातील लॉकेट काढले अन् त्याला किस करत सेलिब्रेशन केले. त्याचे हे ७५ वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे हे ८वे कसोटी शतक ठले आणि त्याने सुनील गावस्करांच्या विक्रमाशी ( ८) बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ११ शतकं झळकावली आहेत.
७५ आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यासाठी विराटने ५५२ इनिंग्ज खेळल्या, त्याने सचिन तेंडुलकरचा ५६६ इनिंग्जचा विक्रम मोडला.
१९९३ नंतर प्रथमच भारताच्या १ ते ५ विकेट्सने ५०+ धावांची भागीदारी केली. १९९३मध्ये इंग्लंडविरुद्ध नवज्योत सिंग सिद्धू, मनोज प्रभाकर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन व प्रविण आम्रे यांनी हा पराक्रम केला होता. आजच्या कसोटीत रोहित, गिल, पुजारा, कोहली, जडेजा व भरत यांनी हा पराक्रम केला.
अक्षर पटेल व विराट यांनीही सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून इतिहास घडविला. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताच्या पहिल्या सहा फलंदाजांनी ५०+ धावांची भागीदारी केली. १९६०मध्ये ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजविरुद्ध आणि पाकिस्तानने २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या डावात असा पराक्रम केला होता.