ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीवर मजबूत पकड घेतली. कॅमेरून ग्रीन व उस्मान ख्वाजा या जोडीने भारतीय गोलंदाजांना हैराण केले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३५८ चेंडूंचा सामना करताना २०८ धावांची विक्रमी भागीदारी केली. भारताचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याने एकाच षटकात दोन धक्के देत रोहित शर्माच्या चेहऱ्यावर हसू परतवले. पण, ग्रीन व ख्वाजा यांनी ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रॅव्हीस हेड ( ३२), मार्नस लाबुशेन ( ३) हे माघारी परतल्यानंतर ख्वाजाने एकहाती खिंड लढवली. ख्वाजा व स्टीव्ह स्मिथ यांनी २४८ चेंडूंतील ७९ धावांची भागिदारी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. स्मिथ १३५ चेंडूंत ३८ धावांवर माघारी परतला. मोहम्मद शमीने डावातील दुसरी विकेट घेताना पीटर हँड्सकोम्बाला ( १७) त्रिफळाचीत केले. कॅमेरून ग्रीन व ख्वाजा यांनी दमदार खेळ केला.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने ९२ धावा केल्या. लंच ब्रेकनंतर ग्रीननेही त्याचे शतक पूर्ण केले. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी २०० धावांची भागीदारी केली पूर्ण. भारतात कसोटीत सहाव्या क्रमांकावर शतक झळकावणारा ग्रीन ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी मायकेल क्लार्क ( १५१ , बंगळुरू, २००४), मार्कस नॉर्थ ( १२८ , बंगळुरू, २०१०) व ग्लेन मॅक्सवेल ( १०४, रांची, २०१७) यांनी हा पराक्रम केला होता.
मागील १० वर्षांत भारताविरुद्ध घरच्या मैदानावरील ही २००+ धावांची दुसरी भागीदारी ठरली, तर दोन फलंदाजांनी शतक झळकावणअयाची ही पाचवी वेळ आहे. २०१६ मध्ये रूट/मोईन/स्टोक्स यांनी राजकोट कसोटीत, २०१७मध्ये स्मिथ/मॅक्सवेल यांनी रांची कसोटीत, २०१७मध्ये चंडीमल/मॅथ्यूज यांनी दिल्लीत आणि १०१९मध्ये एल्गर /डी कॉक यांनी विशाखापट्टणम येथे हा पराक्रम केला.
कॅमेरून ग्रीन १७० चेंडूंत १८ चौकारांच्या मदतीने ११४ धावांवर अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अश्विनने त्याच षटकात अॅलेक्स केरीला ( ०) माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाला दोन झटके दिले. ग्रीन व ख्वाजा यांची २०८ धावांची भागीदारी विक्रमी ठरली. भारतातील ऑस्ट्रेलियाची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अॅलेन बॉर्डर व के ह्यजेस यांनी १९७९ मध्ये चेन्नई कसोटीत २२२ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर ग्रीन व ख्वाजाचा क्रमांक येतो. या दोघांनी १९६० मध्ये एन हार्वी व एन ओ नेल यांचा २०७ व के ह्यजेस व जी यालोप यांचा २०६ ( १९७९, कोलकाता) विक्रम मोडला.